गेल्या काही दिवसांपासून भारतीय राजकारणात महाभारत, रामायणातील पात्रांची चर्चा मोठ्याप्रमाणात सुरू आहे. ‘महाभारत’ या टीव्ही मालिकेत युधिष्ठिरची भूमिका साकारलेले गजेंद्र चौहान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आधुनिक भारताचे युधिष्ठिर म्हटले आहे. मोदी हे नि:स्वार्थपण देशाची सेवा करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुरादाबाद येथे एका खासगी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते आले होते. त्यांनी चित्रपटाच्या सध्याच्या स्थितीवर आणि राजकारणावरही खुलेपणाने आपले विचार मांडले.
जेव्हा देशात निवडणुका येतात. तेव्हा एक नवीन गोष्ट सुरू होते. जसे उत्तर प्रदेशचे महाभारत, दिललीचे महाभारत, प्रत्येक महाभारतात युधिष्ठिरची आवश्यकता असते. २०१४ मध्ये ज्या पद्धतीने देशातील जनतेने मोदींना विजयी करून देशाची सत्ता त्यांच्याकडे सोपवली होती. आताही तसेच होणार आहे. त्या महाभारतात युधिष्ठिरला हस्तिनापूरची जबाबदारी देण्यात आली होती. या युगात भारताची जबाबदारी या आधुनिक युधिष्ठिररूपी मोदींकडे सोपवण्यात आली आहे.
ते म्हणाले, २०४०-५० मध्ये जेव्हा देश वाईट स्थितीतून जात असेल. त्यावेळी लोक मोदींची आठवण काढून मोदींसारख्या पंतप्रधानाची आवश्यकता आहे, असे म्हणतील. भाजपा मोदींच्या नेतृत्वाखाली क्लीनस्वीप करणार असून सर्व वृत्त वाहिनींचे दावे खोटे ठरवत यावेळी ३०० हून अधिक जागा मिळवणार आहे.