पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी देशातील करोना रुग्णांची संख्या जास्त असलेल्या १० राज्यांच्या ५४ जिल्ह्यांमधील जिल्हाधिकऱ्यांसोबत संवाद साधतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही उच्चस्तरीय बैठक घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि  ममता बॅनर्जी देखील या बैठकीत उपस्थित राहणार आहेत. याआधी मंगळवारी त्यांनी नऊ राज्यांतील ४६ जिल्ह्यांच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला होता.

महाराष्ट्र, दिल्ली, यूपीसारख्या अनेक राज्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढत्या करोना रुग्णसंख्येवरुन मुख्यमंत्र्यांसोबत  आढावा बैठक घेतली होती. पण आता करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार खेड्यांमध्ये वाढताना दिसत आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता जिल्हावार बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. करोनाची रुग्ण संख्या ज्या जिल्ह्यांमध्ये जास्त आहे त्या जिल्हाधिकऱ्यांसोबत ते चर्चा करतील. करोनाच्या पहिल्या लाटेचा परिणाम गेल्या वर्षी मुंबई, दिल्ली, बेंगळुरू अशा मोठ्या शहरांमध्ये दिसून आला होता, पण आता दुसर्‍या लाटेचा परिणाम ग्रामीण भागातही दिसून येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज १० राज्यामंध्ये करोनामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल चर्चा करतील. या बैठकीत पंतप्रधान स्थानिक पातळीवरील परिस्थितीचा आढावा घेतील. संबंधित राज्यांचे मुख्यमंत्रीही या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधानांची जिल्हाधिकऱ्यांसोबत दुसरी बैठक आहे.

पंतप्रधान छत्तीसगड, हरियाणा, केरळ, महाराष्ट्र, ओडिशा, पुडुचेरी, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश या १० राज्यांच्या जिल्हा दंडाधिकारी आणि क्षेत्र अधिकारी यांच्याशी संवाद साधतील. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज पंतप्रधान मोदींनी बोलावलेल्या बैठकीत सहभागी होण्याची शक्यता आहे.

गेल्या बैठकीत पंतप्रधानांनी अनेक राज्यांमध्ये करोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे म्हटले होते. तसेच रुग्णसंख्या कमी होणाऱ्या राज्यांकडे जास्त लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितल होते.