आगामी २०१४च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर देशात धार्मिक िहसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगरमध्ये झालेल्या जातीय दंगलींच्या मागेही राजकीय पक्षांचा हात असल्याची शक्यता केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बुधवारी व्यक्त केली.
मुझफ्फरनगरमधील दंगलीबाबतचा संपूर्ण अहवाल हाती येत नाही तोपर्यंत यामागे राजकीय कट असल्याचे ठामपणे सांगता येत नाही, असेही शिंदे यांनी येथे एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
२०१४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर केंद्र सरकारने ११ राज्यांना धार्मिक दंगली होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिलेला आहे. तसेच अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही केल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले.
उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या या जातीय दंग्याबाबत सत्ताधारी समाजवादी पक्ष आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना जबाबदार धरण्यास शिंदे यांनी नकार दिला. तसेच दंगलग्रस्त भागातील परिस्थिती आता पूर्वपदावर येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
अर्धलष्करी दलाच्या ८० तुकडय़ा, तसेच लष्कराच्या तुकडय़ाही दंगलग्रस्त भागांमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. परिस्थिती पूर्वपदावर येत असून, संचारबंदीही शिथिल करण्यात येत असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 11, 2013 6:26 am