करोनामुळे बिहारमधील परिस्थितीही गेल्या काही दिवसांपासून चिंताजनक बनली आहे. राज्यात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. दुसरीकडे बिहार विधानसभा निवडणुकही जवळ येऊ लागली आहे. भाजपानं निवडणुकीचे बिगुल वाजवले आहेत. त्यामुळे बिहारमध्ये निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. यावरून राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी नितीशकुमार यांच्यावर निशाणा साधला आहे.

प्रशांत किशोर यांनी ट्विट करून नितीश कुमार यांच्यावर टीका केली आहे. “देशात सर्वात कमी टेस्टिंग, पॉझिटिव्ह रेट ७ ते ९ टक्के आणि ६ हजारांहून अधिक करोना रुग्ण असताना बिहारमध्ये करोनाऐवजी निवडणुकीची चर्चा सुरू आहे. करोनाच्या भीतीपोटी तीन महिन्यांपासून आपल्या घरातून बाहेर न पडणाऱ्या नितीशकुमार यांना असं वाटत की, लोकांनी घराबाहेर पडून निवडणुकीत सहभागी होण्यात कसलाही धोका नाही,” असा टोला प्रशांत किशोर यांनी लगावला आहे.

आणखी वाचा- “हे या लॉकडाउननं सिद्ध केलं”; आईन्स्टाईन यांचं वाक्य शेअर करत राहुल गांधींची मोदींवर टीका

बिहारमधील सद्यस्थिती कशी आहे?

स्थलांतरित मजुरांसह प्रवासी वाहतूक सुरू झाल्यानंतर बिहारमधील करोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. सध्या बिहारमध्ये ६ हजार ४७५ इतकी आहे. मागील २४ तासात बिहारमध्ये १८६ जणांना करोना झाल्याचं आढळून आलं आहे. बिहारमध्ये आतापर्यंत १ लाख २३ हजार ६२९ लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर मागील २४ तासात ३७० रुग्ण करोनामुक्त झाल्याचा दावा बिहारच्या आरोग्य विभागानं केला आहे.

आणखी वाचा- बनावट व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी दिग्विजय सिंग अडचणीत; FIR दाखल

अमित शाह यांनी घेतली होती व्हर्च्युअल रॅली

अमित शाह यांनी व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून बिहारमधील जनतेशी संवाद साधला होता. “मुंबई, दिल्ली, हरियाणा, गुजरात, तामीळनाडू असा देशातील कुठलाही कोपरा घ्या, तिथल्या विकासाचा पाया बिहारच्या मजुरांच्या घामातून उभा राहिलेला दिसेल. जे लोक बिहारच्या मजुरांचा अपमान करत आहेत, त्यांना या मजुरांच्या भावभावनांची किंमत कळलेली नाही. पंतप्रधान मोदी यांनी प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बिहारच्या मजुरांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यास सांगितले. त्यासाठी राज्यांना केंद्राने ११ हजार कोटी रुपये दिले. मजूर पायी निघाले तेव्हा त्यांच्यासाठी रेल्वेगाड्या, बसगाडय़ांची सोय केली. त्यांना जेवण-पाणी, औषधे दिली. मजुरांच्या प्रवासाचा ८५ टक्के खर्च केंद्राने केला, असा दावा शहा यांनी व्हर्च्युअल रॅलीत केला होता.