नजीब जंग यांनी दिल्लीच्या नायब राज्यपालपदाचा दिलेला राजीनामा बुधवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना मंजूर केला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने या पदासाठी आता अनिल बैजल यांची यांचे नाव पाठवले असून आता राष्ट्रपतींनीही त्यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे बैजल यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. बैजल हे दिल्लीचे २१ वे नायब राज्यपाल असतील.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबतच्या वादामुळे चर्चेत राहणारे नजीब जंग यांनी गेल्या आठवड्यात दिल्लीच्या नायब राज्यपालपदाचा राजीनामा दिला होता. जंग यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यावर आश्चर्य व्यक्त होत होते. बुधवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी जंग यांचा राजीनामा मंजूर केला. केंद्र सरकारने नायब राज्यपालपदासाठी अनिल बैजल यांचे नाव पाठवले आहे. ७० वर्षीय बैजल हे १९६९ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात बैजल यांनी गृहसचिव म्हणून काम केले होते. केंद्र सरकारच्या विविध खात्यांमध्ये त्यांनी काम केले असून नगर विकास मंत्रालयातील सचिवपदावरुन ते २००६ मध्ये निवृत्त झाले होते. राष्ट्रपतींनीही या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. अनिल बैजल यांच्यासमोर सत्ताधारी आपसोबत समन्वय साधण्याचे आव्हान असणार आहे. बैजल यांच्या नियुक्तीचे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी स्वागत केले आहे.

गेल्या आठवड्यात नजीब जंग यांच्या राजीनाम्याने खळबळ माजली होती. सत्ताधारी आपकडून वारंवार होणा-या शाब्दिक हल्ल्यामुळे जंग नाराज झाले होते. यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा होती. राजीनामा दिल्यावर जंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. याभेटीनंतर त्यांनी मोदींचे कौतुक केले होते. मोदींना हिंदूसोबत अल्पसंख्याक समाजालाही पुढे न्यायचे आहे. त्यांच्याकडे सर्वांना एकत्र नेण्याची दृष्टी आहे असे त्यांनी म्हटले होते.

जंग यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी त्यांचे कौतूक करत भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. राजीनामा दिल्यावर नजीब जंग पुन्हा शिक्षण क्षेत्रात परततील असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले होते. मध्यप्रदेशमधील माजी आयएएस अधिकारी आणि जमिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील माजी कुलगुरु नजीब जंग यांची जुलै २०१३ मध्ये दिल्लीच्या नायब राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती.