पश्चिम बंगालमधल्या ठाकूर नगर येथील रॅलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणादरम्यान गोंधळ उडाल्याने आणि गदारोळ झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना भाषण अवघ्या चौदा मिनिटात उरकावं लागलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलण्यासाठी उभे राहिले काही वेळ बोलल्यानंतर गर्दी आणि गदारोळ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकांना माइकवरून आवाहन करत शांत रहाण्यास सांगितलं मात्र लोकांनी मोठ्या प्रमाणावर गदारोळ करण्यास सुरुवात केली ज्यानंतर अवघ्या चौदा मिनिटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण आटोपतं घेतलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात ममता बॅनर्जींवर टीका करण्यास सुरुवात केली ज्यानंतर लोकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली तसेच रॅली असलेल्या ठिकाणी एकच गदारोळ झाला. पोलिसांनीही ही गर्दी आवरण्याचा प्रयत्न केला मात्र लोकांच्या गर्दीला आवर घालताना त्यांच्याही नाकी नऊ आले.

मोदींच्या भाषणादरम्यान झालेल्या गर्दीत काही लोक जखमीही झाले. या जखमींना तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लोकांच्या उत्साहाला दाद दिली आणि झालेल्या प्रकराबद्दल खेद व्यक्त केला. तुम्ही एवढ्या प्रचंड संख्येने इथे आलात हे माझे भाग्य समजतो. या मैदानाची जेवढी क्षमता आहे त्याच्या दुप्पट लोक आल्याचं दिसतं आहे. तुम्हाला जो काही त्रास होतो आहे त्याबद्दल मी दिलगीर आहे असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचं भाषण संपवलं. आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा सबका साथ सबका विकास या घोषणेचा नारा दिला. लोक त्यांचे भाषण ऐकण्यासाठी उत्सुक होते. मात्र गर्दीच इतक्या मोठ्या प्रमाणावर झाली की मोदींना त्यांचं भाषण आटोपतं घ्यावं लागलं.