सुषमा स्वराज परराष्ट्र मंत्री म्हणून पूर्णपणे सक्षम आहेत पण सध्या परराष्ट्र मंत्रालयामध्ये पंतप्रधान कार्यालयाचा हस्तक्षेप मोठया प्रमाणावर असतो असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. नरेंद्र मोदींनी परराष्ट्र मंत्र्यांच्या अधिकारावर अतिक्रमण केले असून पद्धतशीरपणे सुषमा स्वराज यांचे महत्व कमी केले जात आहे असा आरोप राहुल गांधी यांनी शुक्रवारी लंडनच्या स्ट्रॅटजिक स्टडीज इन्स्टिट्यूटमध्ये बोलताना केला.
परराष्ट्र मंत्रालयात पंतप्रधान कार्यालयाच्या हस्तक्षेपामुळे सुषमा स्वराज यांच्याकडे व्हिसा जारी करण्याशिवाय काहीही काम उरलेले नाही असे राहुल म्हणाले. त्यांनी मोदींच्या परराष्ट्र धोरणावरही सडकून टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींना डोकलामचा संघर्ष टाळता आला असता. पण त्यांनी फक्त एक घटना म्हणून त्याकडे पाहिले. चिनी सैन्य अजूनही डोकलाममध्ये आहे हे सत्य आहे. डोकलामच्या संघर्षाबद्दल माझ्याकडे संपूर्ण माहिती नाहीय. त्यामुळे मी हा विषय वेगळया पद्धतीने कसा हाताळला असता हे मला सांगता येणार नाही असे राहुल म्हणाले.
आरएसएसचं दहशतवादी मुस्लीम ब्रदरहूडशी साम्य
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भारताचा आत्माच बदलायचा असून अन्य कुठल्याही संघटनांनी भारतातल्या संस्थांवर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न केला नसल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी केला आहे. लंडनमध्ये इंटरनॅशनल इन्स्टिट्युट ऑफ स्ट्रेटेजिक स्टडीज येथे शुक्रवारी ते बोलत होते. गांधी हे सध्या जर्मनी व इंग्लंडच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. मुस्लीम ब्रदरहूड या अनेक अरब देशांनी दहशतवादी म्हणून जाहीर केलेल्या संघटनेशी गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना केली. मुस्लीम ब्रदरहूडच्या संकल्पनेशी आरएसएसची संकल्पना मिळतीजुळती असल्याचा आरोप यावेळी गांधी यांनी केला आहे.