देशाची स्थिती सध्याच्या घडीला बिघडून गेली आहे. ही सुधारण्यासाठी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तीन सल्ले दिले आहेत. राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओद्वारे त्यांनी हे तीन सल्ले दिले आहेत.

काय आहेत राहुल गांधी यांनी दिलेले सल्ले?

गरीबांच्या बँक खात्यात पैसे जमा करा

देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या लघू आणि मध्यम उद्योगांना वाचवा. त्यांना आर्थिक डबघाईतून सुधारण्यासाठी निधी उपलब्ध करुन द्या

३) खासगीकरण थांबवा, फक्त मित्रांना फायदा करुन देणं बंद करा, देशाची युवा पिढी तुमच्याकडे आशेने पाहते आहे. त्यांना दिलासा देणं हे तुमचं काम आहे.

हे तीन उपाय राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुचवले आहेत.

आणखी काय म्हणाले राहुल गांधी?
“सध्या देशाची जी स्थिती आहे ती आपल्याला प्रत्येकालाच ठाऊक आहे. देशाची युवा पिढी ही या देशाचं भविष्य आहे, सध्या या पिढीलाही देशाचं भवितव्य दिसतं आहे. करोनाची साथ येण्याआधी मी सांगितलं होतं की वादळ येतंय, सावध व्हा आणि तयारीला लागा. त्यावेळी मोदी सरकारने माझी खिल्ली उडवली. जेव्हा करोनाची साथ आली तेव्हा मी पुन्हा एकदा सल्ला दिला. युवकांच्या भवितव्यासाठी मोदी सरकारला तीन काम करावी लागतील असं मी तेव्हा म्हटलं होतं. प्रत्येक गरीबाच्या बँक अकाऊंटमध्ये पैसे, लघू आणि मध्यम उद्योग हे युवकांचं भविष्य आहे त्यांचं रक्षण करा. धोरणात्मक निर्णय घ्या आणि स्थिती सुधारा. हे मी त्यावेळीही सांगितलं होतं. मात्र मोदी सरकारने काहीही केलं नाही. फक्त नरेंद्र मोदींच्या काही निवडक १५ ते २० मित्रांचा फायदा झाला. त्यांना करमाफीही देण्यात आली. आज मला पंतप्रधानांना हे सांगायचं आहे की युवा पिढी तुमच्याकडे आशेने पाहते आहे. तुम्ही देशाची अर्थव्यवस्था नष्ट केली ”

अशी टीका या व्हिडीओच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी केली आहे. तसंच #SpeakUpForJobs हा हॅशटॅगही ट्रेंड केला आहे. एवढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्ही गप्प का? असाही प्रश्न राहुल गांधींनी विचारला आहे. तुम्ही अर्थव्यवस्था असो, युवकांच्या नोकऱ्या असो किंवा चीन प्रश्न असो कशाबद्दल काहीही बोलत नाहीत. हे योग्य नाही. तुम्ही गप्प का बसला आहात? असंही राहुल गांधींनी विचारलं आहे.