पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वच्छता केंद्राचं उद्घाटन करताना अस्वच्छतेला देशातून हद्दपार करण्याचं आवाहन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी प्रतिसाद दिला. “देशात वाढत असलेली असत्याची घाणही साफ करायची आहे,” असं म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना एक सवाल केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राष्ट्रीय स्वच्छता केंद्राचे (आरएसके) उद्घाटन केले. राष्ट्रीय स्वच्छता केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी गांधीजींच्या नेतृत्वात झालेल्या भारत छोडो आंदोलनाविषयी भाष्य केलं. “देशाला कुमकुवत बनवणाऱ्या वाईट गोष्टींना भारतातून हद्दपार करण्यासारखी चांगली दुसरी कोणती गोष्ट आहे,” असं सांगत मोदी यांनी अस्वच्छतेला देशातून हद्दपार करण्यासाठी ‘भारत छोडो’चा नारा दिला.

पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या या आवाहनानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून मोदींचं वाक्य असलेलं ट्विट रिट्विट केलं करत सत्य सांगण्याचं आव्हान दिलं. “का नाही! आपल्याला एक पाऊल पुढे जाऊन देशात वाढत चाललेल्या असत्याची घाणही साफ करायची आहे. पंतप्रधान चीननं आक्रमणाविषयीचं सत्य देशाला सांगून या सत्याग्रहाची सुरू करणार का?,” असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले होते?

“भारत छोडो बद्दलचे हे सर्व संकल्प स्वराज्यपासून सुराज्याच्या भावनेला अनुसरूनच आहेत. याच अनुषंगाने आज आपल्या सर्वांना ‘गंदगी भारत छोड़ो’चा संकल्प देखील पुनश्च करायचा आहे. आजपासून १५ ऑगस्टपर्यंत म्हणजे स्वतंत्रता दिवसापर्यंत देशात एक आठवडा मोठं अभियान राबवूयात,” असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी अस्वच्छतेला देशातून हद्दपार करण्यासाठी ‘अस्वच्छतेविरोधात भारत छोडो’चा यावेळी नारा दिला.