काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आहे. महिला आणि वयस्कर व्यक्तींना सन्मान देण्याच्या मुद्द्यावरुन राहुल गांधींनी संघावर निशाणा साधला आहे. तसेच या पुढे आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ‘संघ परिवार’ म्हणणार नाही असा टोलाही राहुल यांनी ट्विटरवरुन लगावला आहे.

राहुल गांधींनी ट्विटरवरुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये महिला आणि वयस्कर व्यक्तींना सन्मान दिला जात नाही अशी टीका केलीय. “माझ्या मते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संबंधित संघटनांना संघ परिवार असं म्हणणं योग्य ठरणार नाही. परिवार (कुटुंब) म्हटल्यावर तिथे महिलांचा आणि वयस्कर व्यक्तींचा आदर केला जातो. या व्यक्तींबद्दल आदर आणि प्रेमाची भावना असते. असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये घडत नाही. त्यामुळे मी यापुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संघ परिवार म्हणणार नाही,” असं राहुल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

उत्तर प्रदेशमध्ये ख्रिश्चन महिला पाद्र्यांवर धर्मप्रसार करत असल्याचा आरोप करत ट्रेनमधून उतरवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी हे ट्विट केलं आहे. या घटनेचाही राहुल गांधींनी विरोध केला असून हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केलेलं हे कृत्य म्हणजे संघाचा प्रपोगांडा राबवण्याचा प्रयत्न असल्याचा टोला राहुल यांनी लगावला आहे.

राहुल गांधींनी अशाप्रकारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. महिन्याभरापूर्वीच म्हणजेच २७ फेब्रुवारी रोजी राहुल गांधींनी तामिळनाडूमधील थुतूकुटी येथील सभेमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली होती. व्हीओसी महाविद्यालयात बोलताना राहुल गांधींनी मोदी सरकार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार निशाणा साधला होता. मोदी सरकार घटनात्मक संस्थांना उध्वस्त करत आहे त्यामुळे लोकांना संसद व न्यायपालिकेवर विश्वास राहिलेला नाही. अस राहुल गांधी म्हणाले होते. “मागील सहा वर्षापासून देशाला एकसंध बनवून ठेवणाऱ्या सर्व निवडक संस्था व फ्री प्रेसवर पद्धतशीर हल्ला सुरू आहे. लोकशाही अचानक मरत नाही, ती हळूहळू मरते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संस्थात्मक संतुलन नष्ट केलं आहे.” असा टोला राहुल यांनी लगावला होता.