काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरूवारी दिल्लीतील जंतर-मंतरवर दलित आंदोलनात सहभाग नोंदवून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले होते. राहुल यांच्या टीकेला भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राहुलजी जर तुम्हाला डोळा मारण्यातून आणि संसदेत गोंधळ घालण्यापासून वेळ मिळाला तर वस्तुस्थिती तपासून पाहा, अशा शब्दांत खोचक टोला लगावला. मोदी सरकारने संशोधित विधेयकाच्या माध्यमातून एससी/एसटी अॅक्ट मजबूत केले आहे. मग तुम्ही आंदोलन का करत आहात, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

शाह यांनी सलग ट्विट करत राहुल गांधींवर निशाणा साधला. ते म्हणाले, काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकर, बाबू जगजीवनराम आणि सीताराम केसरी यांना ज्या पद्धतीची वर्तणूक दिली त्यावर राहुल यांनी बोलावे. काँग्रेसने सातत्याने दलितांवर अत्याचार केला आहे.

ज्या वर्षी सोनिया गांधीं काँग्रेसमध्ये सक्रीय झाल्या त्याचवर्षी तिसरी आघाडी-काँग्रेसच्या सरकारने बढतीमध्ये आरक्षणाला विरोध केला. तसेच ज्या वर्षी राहुल गांधी पक्षाचे अध्यक्ष झाले. तेव्हा त्यांनी एससी/एसटी अॅक्ट आणि ओबीसी आयोगाला विरोध केला, हा निव्वळ योगायोग म्हणता येईल. यातून त्यांचा मागासविरोधी विचार दिसून येतो.

राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल करताना ते म्हणाले, तुमच्याकडून संशोधन आणि प्रामाणिकपणाची अपेक्षा करणे चुकीचे आहे. तरीही तुम्ही राजीव गांधी यांचे मंडल आयोगावेळचे वक्तव्य तपासून पाहा. त्यावरून तुमच्या लक्षात येईल.

दरम्यान, गुरूवारी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना मोदींच्या मनात दलितांसाठी कोणती जागा नसल्याचे म्हटले होते. मोदींचे विचार हे दलित विरोधी आहेत. आपण सर्वांनी एकत्र येऊन २०१९ मध्ये त्यांना पराभूत करू. काँग्रेसने नेहमी एससी/एसटी अॅक्टचे संरक्षण केले असून भविष्यातही करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली होती.