काँग्रेसचे माजी अध्यक्ष व नेते राहुल गांधी यांनी आणीबाणी संदर्भात केलेल्या विधानावरून आता, राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. आणीबाणी लावणं चूक होती आणि त्या काळात जे काही घडलं ते देखील चुकीचं होतं, असं प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ कौशिक बासू यांच्याशी चर्चा करत असताना राहुल गांधी यांनी विधान केलेलं आहे. यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

“आजीने आणलेली आणीबाणीही चुकीची होती हे राहुल गांधी यांनी आता मान्य केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी ज्या चुकीच्या, तथ्यहीन आणि तिरस्करणीय टिप्पण्या केल्या होत्या, त्याबद्दल त्यांनी त्वरित माफी मागावी. नाहीतर काही वर्षानंतर याचीही जाणीव त्यांना होईल आणि मग माफी मागितली जाईल, पण नंतर देशातील जनता त्यांना माफ करणार नाही. राहुल गांधी माफी मागता मागता थकून जातील पण त्यांच्या गुन्ह्यांची मोजणी संपणार नाही.” अशा शब्दांमध्ये चंद्रकांत पाटील यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.

“आणीबाणीच्या काळात ज्या लोकांचे जीव गेले, त्यांनी ज्या प्रकारे लोकशाहीची हत्या केली… ते माफ करण्यासारखे आहे का? इंदिरा गांधी यांना जो जो कोणी विरोध करेल त्या लाखो लोकांना जेलमध्ये टाकले जायचे,लाखोंचे संसार उध्वस्त झाले. हजारो लोक जेलमध्येच मेले.” असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

“आणीबाणी लावणं एक चूक होती, पण…”; राहुल गांधींचं मोठं विधान

“काँग्रेसकडून आणीबाणी लागू करणं एक चूक होती, पण पक्षाने कधीही घटनात्मक चौकट आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला नाही,” असं राहुल गांधींनी यावेळी म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी आणीबाणी चुकीची होती सांगताना सध्या देशात जे सुरु आहे ते आणीबाणीपेक्षा वेगळं आहे अशी टीका केंद्र सरकारवर केली आहे.

“आता नरेंद्र मोदी आणि भाजपाची वेळ”; राष्ट्रवादीने करून दिली गुजरात दंगलीची आठवण

तर, “आणीबाणीचा निर्णय चुकीचा होता, हे राहुल गांधी यांनी ४५ वर्षांनंतर स्वीकारलं. आता भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची वेळ आहे. गुजरातमधील दंगल चुकीची होती, हे त्यांनी मान्य करावं.” असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलेलं आहे.

तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेतला होता. याविरोधात देशभरात आंदोलन पेटलं होतं. इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेल्या आणीबाणीवरून आजही काँग्रेसवर टीका केली जाते. याच निर्णयाबद्दल राहुल गांधी यांनी ती एक चूक होती, असं म्हटलेलं आहे.