द रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने घेतलेल्या परीक्षांचे निकाल जानेवारी २०२० मध्ये लागणार आहेत. या परीक्षा २०१८-२०१९ मध्ये घेण्यात आल्या होत्या. केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी ही माहिती संसदेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नादरम्यान दिली आहे. या परीक्षांच्या निकालानंतर ३ लाख पदं भरली जाणार आहेत. देशभरात रेल्वेमध्ये होणारी ही सर्वात मोठी भरती असणार आहे.

३ लाख पदांपैकी २ हजार ६२१ पदं ही अधिकारी वर्गांची असणार आहेत. तर उर्वरित पदं ही अधिकारी वर्गाची नसतील असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. सध्याच्या घडीला रेल्वे खात्यात देशभरात १५ लाख २४ हजार कर्मचारी काम करतात. ज्यापैकी १७ हजार ९३८ कर्मचारी हे अधिकारी म्हणून काम करत आहेत. तर १५ लाख ६ हजार १८९ कर्मचारी हे विविध इतर पदांवर काम करत आहेत. आता २०१८-१९ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल जानेवारी २०२० मध्ये लागणार आहेत.