पूर्व लडाखमधील नियंत्रण रेषेवरील स्थिती संदर्भात संरक्षण मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक उच्चस्तरीय बैठक सुरु आहे. या बैठकीत लडाख सीमेवरील स्थितीचा आढावा घेण्यात येत आहे. या बैठकीला लष्कर, नौदल आणि हवाई दलाचे प्रमुख तसेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत आणि एनएसए अजित डोवालही उपस्थित आहेत.

पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवरानजीक अत्यंत स्फोटक स्थिती आहे. भारत आणि चीन दोन्ही देशांचे सैनिक आमने-सामने आहेत. हा तणाव कमी करण्यासाठी गुरुवारी मॉस्कोमध्ये परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांच्यात अत्यंत महत्त्वाची बैठक झाली. यात तणाव कमी करण्यासाठी पाच कलमी कार्यक्रम ठरवण्यात आला. या बैठकीनंतर आज संरक्षण मंत्र्यांची तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांसोबत बैठक सुरु आहे.

या पाच कलमी कार्यक्रमात सीमेवर शांतता आणि स्थिरता ठेवण्यासाठी पूर्वी झालेले करार, शिष्टाचाराचे पालन करायचे तसेच तणाव वाढेल अशी कोणतीही कृती टाळायची असे ठरले आहे. “सीमेवरील सध्याची स्थिती कोणाच्याही हिताची नाही हे दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी मान्य केले. सीमेवर स्थिती सुधारण्यासाठी सैन्य अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरु ठेवण्यावर दोघांमध्ये एकमत झाले आहे. दोन्ही सैन्यांमध्ये योग्य अंतर राखायचे आणि तणाव कमी करायचा” परराष्ट्र मंत्रालयाच्या स्टेटमेंटमध्ये हे म्हटले आहे.