मागील आठवड्यात एका तरूणाने रेल्वे ट्रॅकवर उभे राहून परफेक्ट सेल्फी या नावाने एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओत हा तरूण रेल्वे ट्रॅकवर उभा आहे त्यानंतर भरधाव वेगात एक ट्रेन येते आणि ती ट्रेन त्याच्या डोक्याला धडक देते, ज्यानंतर हा तरूण पडतो त्याचा फोन पडल्याचाही आवाज आपल्याला येतो. मात्र हा सगळा प्रकार फक्त मजेखातर करण्यात आला असल्याचा दावा ABN तेलगु या स्थानिक वृत्तवाहिनीने केला आहे. सेल्फी काढण्यासाठी उभ्या असलेल्या तरूणाचे नाव शिवा असल्याचे समजले आहे.

शिवाने परफेक्ट सेल्फी नावाने पोस्ट केलेला व्हिडिओ निश्चितच काळजाचा ठोका चुकवणारा होता. तसेच या व्हिडिओनंतर सेल्फी मुळे होणाऱ्या विविध अपघातांचीही चर्चा रंगली होती. अनेक प्रसारमाध्यमांनी शिवाला मोठा अपघात झाला, त्याच्या डोक्याला मोठी इजा झाली असे वृत्त दिले होते. मात्र प्रत्यक्षात शिवाला काहीही झाले नसल्याचा दावा ABN तेलगु या स्थानिक वृत्तवाहिनीने केला आहे. इतकेच नाही तर या वृत्तवाहिनीने शिवाचा एक नवा व्हिडिओ दाखवला आहे ज्या व्हिडिओत शिवा त्याच्या मित्रांसोबत हसत खेळत त्याच्याच परफेक्ट सेल्फी व्हिडिओची खिल्ली उडवताना दिसतो आहे.

या वृत्तवाहिनीने परफेक्ट सेल्फी आणि त्यानंतर शिवाचा मित्रांसोबतचा हसताना आणि खिल्ली उडवतानाचा व्हिडिओ दाखवला आहे. मागील आठवड्यात व्हिडिओ व्हायरल करण्याचा प्रकार शिवाने फक्त मजा-मस्ती म्हणून केला असल्याचा दावाही याच वृत्तवाहिनीने केला आहे.  नेल्लुता कविता या पत्रकाराने शिवाचा मित्रांसोबत मजा मस्ती करणारा आणि आपल्याच व्हिडिओची खिल्ली उडवणारा व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओत शिवाला काहीही झाले नाही तो मस्त आहे एकदम असाही दावा त्याच्याकडे बोट करून त्याचे मित्र करताना दिसत आहेत. शिवा आणि त्याच्या मित्रांनी लोकांना ट्रेन अपघातासंदर्भातला व्हिडिओ व्हायरल करून मूर्ख बनवले अशा आशयाचे ट्विट कवितानेही केले आहे.

शिवा हा जिममध्ये इनस्ट्रक्टर म्हणून काम करतो असेही समजले आहे. तसेच हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून तो सापडत नव्हता मात्र आता त्याला त्याच्या मित्रांना या सगळ्या खिल्लीबद्दल अटक करण्यात आली आहे असेही समजते आहे.