सीबीआय संचालकपदाचा तिढा अखेर सुटला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने आयपीएस अधिकारी ऋषी कुमार शुक्ला यांची सीबीआय संचालकपदी नियुक्ती केली आहे. शुक्ला १९८४ बॅचचे अधिकारी असून ते मध्य प्रदेशचे माजी डीजीपी आहेत.

शुक्ला यांची दोन वर्षांसाठी सीबीआय संचालकपदावर निवड झाली असून संस्थेची विश्वासहर्ता पुन्हा निर्माण करण्याचे त्यांच्यासमोर आव्हान आहे. आलोक वर्मा आणि राकेश अस्थाना या दोन अधिकाऱ्यांच्या वादात सीबीआयच्या विश्वसनीयतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ऋषी कुमार शुक्ला अशावेळी सीबीआयचा पदभार संभाळत आहे जेव्हा अधिकाऱ्यांमध्ये योग्य समन्वय नाहीय तसेच अनेकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. हंगामी संचालक एम. नागेश्वर राव यांच्याकडून ते पदभार स्वीकारतील. मागच्या महिन्यात आलोक वर्मा यांची सीबीआय संचालकपदावरुन गच्छंती झाल्यानंतर नागेश्वर राव यांनी हंगामी संचालक म्हणून पदभार स्वीकारला होता.

सीबीआय संचालक निवडीला विलंब होत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. आलोक वर्मा यांना हटवल्यानंतर १० जानेवारीपासून सीबीआय संचालकाचे पद रिक्त होते. यापूर्वी आलोक वर्मा आणि सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांनी परस्परांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. एक फेब्रुवारी २०१७ रोजी वर्मा यांनी सीबीआयच संचालकपदाचा पदभार स्वीकारला होता.