बलात्काराचा आरोप असलेला राष्ट्रीय जनता दलाचा आमदार राजवल्लभ यादव याला पक्षाने रविवारी तत्काळ निलंबित केले आहे.
आमदार राजवल्लभ यादव यांच्यावरील बलात्काराच्या आरोपाची पक्षाने गंभीर दखल घेतली असून त्यांना पक्षातून तात्काळ निलंबित केले आहे, तसेच त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवणारी कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे, असे राष्ट्रीय जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष रामचंद्र पुरबे यांनी सांगितले.
नवाडा जिल्ह्य़ातील मुफासिल पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या नालंदा गावातील आपल्या घरात शिरून ६ फेब्रुवारीला आमदार यादव याने बलात्कार केल्याचा आरोप १५ वर्षांच्या एका मुलीने केला होता. या तक्रारीच्या आधारे यादवला अटक करण्याचा आदेश पोलीस उपमहानिरीक्षक शालीन यांनी शनिवारी दिला.
पीडित मुलीची ९ फेब्रुवारीला नालंदा येथील महिला पोलीस ठाण्यात साक्ष नोंदविण्यात आली असून यादव विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यादव याचे छायाचित्र दाखवले असता ते यादव याचेच असल्याचे मुलीने सांगितले, तसेच त्याला प्रत्यक्ष पाहिल्यावरही तिने त्याला ओळखल्याचे शालीन यांनी सांगितले.
अलीकडच्या विधानसभा निवडणुकीत नवाडा मतदारसंघातून राजदच्या तिकिटावर विजयी झालेले राज यादव हा पूर्वी राजद सरकारमध्ये मंत्री होता. न्यायवैद्यक चाचणीसाठी कपडे ताब्यात घेण्यासाठी नालंदा येथील पोलिसांचे एक पथक गेले होते, परंतु यादवच्या समर्थकांनी हा पुरावा गोळा करताना दंडाधिकाऱ्यांची उपस्थिती आवश्यक असल्याची मागणी केली.