अफगाणिस्तानातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अफगाणिस्तानाची राजधानी काबुलमध्ये बकरी ईदच्या प्रार्थनेवेळी रॉकेट हल्ला झाला आहे. या हल्ल्यामुळे किती नुकसान झाले हे अद्याप समजू शकले नाही. अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती भवनाजवळ हा रॉकेट हल्ला करण्यात आला आहे. परकीय सैन्याने माघार घेतल्यापासून तालिबान अफगाणिस्तानातील प्रमुख शहरे ताब्यात घेण्यात सुरुवात केली आहे. काबूलच्या पारवान भागातून  तीन क्षेपणास्त्रं टाकण्यात आली आहेत. ही क्षेपणास्त्र बाग-ए अली मर्दन, चमन-ए-हुजुरी भागात पडली आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ईद-अल-अधाच्या प्रार्थनेदरम्यान हे तीन रॉकेट राष्ट्रपती भवन जवळील भागात पडले. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार सकाळी आठ वाजता हे रॉकेट डागण्यात आले. या दरम्यान किलेनुमा ग्रीन झोनमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले. ग्रीनमधील राष्ट्रपती भवनाव्यतिरिक्त दूतावास आणि जगातील अनेक देशांच्या इतर मोठ्या इमारती या भागात आहेत. या भागात सुरक्षा सर्वात जास्त आहे.

हल्ल्यांमध्ये कोणतीही जीवितहानी नाही

अफगाणिस्तानच्या अंतर्गत मंत्रालयाने सांगितले की ईद अल-अधाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती अशरफ गनी यांच्या भाषणापूर्वी मंगळवारी राजधानीत तीन रॉकेट घुसले. अफगाणिस्तानच्या शत्रूंनी काबूल शहराच्या वेगवेगळ्या भागात रॉकेट हल्ले केले. हे रॉकेट तीन ठिकाणी आदळले. पण, या हल्ल्यांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. हल्ल्याच्या काही मिनिटांनंतर अध्यक्ष गनी यांनी आपल्या काही उच्च अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत देशाला संबोधून भाषण केले, यापूर्वीही अनेक वेळा राष्ट्रपती भवनाला रॉकेट हल्ल्याद्वारे लक्ष्य केले गेले आहे.

देशातील प्रमुख भाग तालिबानच्या ताब्यात

हा हल्ला अशा वेळी घडला आहे जेव्हा तालिबान देशातील विविध भाग वेगाने ताब्यात घेण्यात व्यस्त आहे. ३१ ऑगस्टपर्यंत अफगाणिस्तानात असलेले परदेशी सैन्यांची माघार जाणार आहे. त्याआधीच तालिबानने आपल्या कारवायांमध्ये वाढ केली आहे. तालिबानने देशातील अनेक प्रमुख सीमा ओलांडून आत प्रवेश केला आहे. याव्यतिरिक्त, अनेक प्रांतांच्या राजधानींना तालिबान लढाऊंनी वेढा घातला आहे. या दरम्यान सहा महिन्यात अफगाण सरकार पडण्याची भीतीही निर्माण झाली आहे. दुसरीकडे, तालिबानच्या सत्तेत परत आल्याबद्दल लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.