सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सल्ल्यानंतर लालकृष्ण अडवाणी यांनी आपले बंड मागे घेतले, असे पक्षाचे अध्यक्ष राजनाथसिंह यांनी सांगितल्याला २४ तास उलटत नाही, तोच भाजपच्या अंतर्गत कारभारात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कधीच हस्तक्षेप करत नाही, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते राम माधव यांनी बुधवारी केले.
लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला जेव्हा काही सल्ला देण्याची गरज असते. त्यावेळी समाजातील किंवा देशातील एखादा ज्येष्ठ नेताच ते काम करू शकतो. केवळ मोहन भागवत यांनीच नाही, तर भाजपमधीलही अनेक ज्येष्ठ नेत्यांनी अडवाणींना राजीनामा मागे घेण्याचा सल्ला दिला होता, असे राम माधव यांनी म्हटले आहे.
भाजपच्या सध्याच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त करून लालकृष्ण अडवाणी यांनी निवडणूक समिती, संसदीय मंडळ आणि राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. मोहन भागवत यांनी अडवाणींना राजीनामा मागे घेण्याचा सल्ला दिल्यानंतरच त्यांनी आपला निर्णय मागे घेतला होता. यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भाजपवर दबाव असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्याला राम माधव यांनी उत्तर दिले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 12, 2013 4:20 am