डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाला आहे. गुरुवारी भारतीय चलन रुपयाने आतापर्यंतची सर्वात नीचांकी पातळी गाठली. सकाळी रुपया २८ पैशांच्या घसरणीसह डॉलरच्या तुलनेत ६८.८९ रुपयांवर खुला झाला. त्यानंतर रुपयाने ६९.०९ ही आतापर्यंतची सर्वात नीचांकी पातळी गाठली.

त्यानंतर रुपयामध्ये काही प्रमाणात सुधारणा झाली. आता रुपया ६८.८२ वर स्थिर आहे. २४ नोव्हेंबर २०१६ रोजी रुपया ६८.८६ वर पोहोचला होता. या नीचांकी पातळीचा विक्रम रुपयाने आज मोडीत काढला. आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्चा तेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे तसेच महागाई आणि वित्तीय तूट यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये घसरण झाली. बुधवारी रुपया ६८.६१ वर बंद झाला होता.

बँका आणि आयातदारांकडून सातत्याने डॉलरची मागणी वाढत आहे. तेलांच्या वाढत्या किंमतींमुळे खासकरुन तेल कंपन्यांकडून डॉलरची जास्त मागणी आहे. त्यामुळे रुपयावरील दबाव वाढला आहे. अमेरिकेने आपल्या मित्र राष्ट्रांना इराणकडून तेल खरेदी नोव्हेंबरपर्यंत संपवायला सांगितली आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय तेल बाजारात तेलाच्या किंमती वाढत आहेत.

तेलाच्या वाढत्या किंमती आणि रुपयाची घसरण या दोघांचा भारतीय अर्थव्यवस्थेला दुहेरी फटका बसत आहे. रुपयाची घसरण रोखण्याचे आरबीआय समोरील आव्हान दिवसेंदिवस कठिण होत चालले आहे. यामध्ये वित्तीय तूटही वाढत चालली आहे.