प्राप्तिकरछाप्यावेळी निदर्शने केल्याचे कारण

बेंगळुरू : लोकसभा निवडणुकीवेळी प्राप्तिकर खात्याने टाकलेल्या छाप्यावेळी निदर्शने केल्याच्या कारणावरून पोलिसांनी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या व एच.डी. कुमारस्वामी तसेच बेंगळुरूचे तत्कालीन पोलिस आयुक्त टी. सुनीलकुमार तसेच त्यांच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.

कार्यकर्ते मल्लिकार्जुन ए यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून शहर न्यायालयाने कमर्शियल स्ट्रीट पोलिस स्टेशनला असा आदेश दिला, की गुन्हेगारी कट, देशाविरोधात युद्ध पुकारणे या कलमांखाली या सर्वावर गुन्हे दाखल करण्यात यावेत. काँग्रेस व जनता दल धर्मनिरपेक्ष नेत्यांच्या निवासस्थानी प्राप्तिकर छापे टाकण्यात आल्याच्या मुद्दय़ावरून मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी व इतरांनी प्राप्तिकर खात्याच्या कार्यालयासमोर आंदोलन केले होते. कुमार स्वामी यांनी कारवाईची पूर्वसूचना मिळाल्यानंतर त्याची माहिती आधीच जाहीर केली होती. कुमार स्वामी यांनी २७ मार्च रोजी माध्यमांना असे सांगितले होते,की केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठय़ा प्रमाणात केंद्रीय सुरक्षा जवान आणले असून पुढील काही दिवसात राज्याच्या काही भागात प्राप्तिकर खात्याचे छापे पडण्याची शक्यता आहे. नंतर त्यांचे म्हणणे खरे झाले होते. विविध भागात प्राप्तिकर खात्याने छापे टाकले होते. त्या वेळी उपमुख्यमंत्री जी. परमेश्वरा, डी.के.शिवकुमार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडुराव,तत्कालीन पोलिस उपआयुक्त राहुल कुमार व डी.देवराजू व सर्व निवडणूक अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

‘आरोप राजकीय हेतूने प्रेरित’

देशद्रोहाच्या आरोपावर शिवकुमार यांनी सांगितले, की देशद्रोहाचे आरोप हे राजकीय हेतूने प्रेरित आहेत. त्याला राजकीय पातळीवर उत्तर देऊ, आम्ही प्राप्तिकर कार्यालयात प्रवेश केला नव्हता, आम्ही १५० मीटर दूर अंतरावर आंदोलन करून घोषणा दिल्या होत्या.