देशात लशींचा तुटवडा जाणवत असल्याने गेल्या काही महिन्यात लसीकरणाचा वेग मंदावला आहे. करोना लसीच्या निर्मितासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा तुटवडा जाणवू लागल्याने उत्पादनात घट झाली होती. कोविशिल्ड या करोना लसीचं उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्युटचे अदर पूनावाला यांनी ही माहिती दिली होती. मात्र आता हा प्रश्न पूर्णपणे सुटला आहे. यासाठी अदर पूनावाला यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे आभार मानले आहेत. त्यामुळे लसीकरण उत्पादनाला पुन्हा एकदा वेग मिळणार आहे. अमेरिकेनं संरक्षण उत्पादन अधिनियमांतर्गत कच्चा मालावर लावलेलं निर्बंध गुरुवारी हटवले आहेत.

“अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या प्रयत्नांसाठी धन्यवाद, नव्या नितीमुळे भारतात कच्चा मालाच्या पुरवठ्यात वाढ होणार आहे. त्यामुळे करोना लसीच्या उत्पादनात वाढ होईल. करोना विरुद्धची लढाई आपण एकजूटीने लढू”, असं ट्वीट अदर पूनावाला यांनी केलं आहे.

महिन्याला १०-११ कोटी डोसचं लक्ष्य!

सिरम इन्स्टिट्युटतर्फे Astrazeneca आणि Oxford यांच्यासोबत संयुक्तपणे Covishield लसीचं उत्पादन केलं जात आहे. सध्या महिन्याला ६ ते ६.५ कोटी डोसचं उत्पादन सीरमच्या पुण्यातील प्लांटमध्ये सुरू असून ते १० ते ११ कोटींपर्यंत नेण्याचं ध्येय या गाठण्याचा संकल्प अदर पूनावाला यांनी यापूर्वी बोलून दाखवला होता.