मोदींबरोबरील खासदारांच्या भेटीचे विपर्यासयुक्त वार्ताकन केल्याचा दावा; निषेधही नोंदविला

नोटाबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवसेनेच्या बारा खासदारांनी घेतलेल्या भेटीचे विपर्यास करणारे वार्ताकन केल्यावरून शिवसेनेने बुधवारी माध्यमांचा निषेध केला. शिवसेना खासदारांना मोदींनी फटकारले नाही. याउलट जे काही ते बोलले, ते शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबतच्या नितांत आदरापोटी बोलले, असेही शिवसेनेने नमूद केले.

मोदींबरोबरील खासदारांची भेट खूप चांगली झाली. जिल्हा बँकांचा प्रश्न सोडविण्यासंदर्भात मोदींनी आम्हाला आश्वासन दिले आणि त्यानुसार बुधवारी नाबार्डमार्फत जिल्हा बँकांना २१ हजार कोटींचा निधी देण्याचा निर्णयही झाला. शिवसेनेच्या प्रयत्नांना यश आले असताना मंगळवारच्या भेटीचे काही वर्तमानपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये अत्यंत विपर्यासयुक्त वार्ताकन करण्यात आले. ‘मोदींनी शिवसेनेला फटकारले’, ठणकावले, ‘शिवसेनेची तलवार म्यान झाली’, असे निखालस खोटे लिहिले गेले. आम्ही त्याचा निषेध करतो,’ असे शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते आणि अमरावतीचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी बुधवारी सकाळी घाईघाईने बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संसदेच्या कार्यालयामध्ये झालेल्या या परिषदेला राज्यसभेतील गटनेते संजय राऊत, चंद्रकांत खैरे यांच्यासह अनेक खासदार आवर्जून उपस्थित होते. राऊत यांनीही माध्यमांच्या अनुचित वार्ताकनावर तोंडसुख घेतले.

जिल्हा बँका व सहकारी बँकांच्या आवळलेल्या नाडय़ांसंदर्भात मंगळवारी दुपारी शिवसेनेच्या २१ पैकी बारा खासदारांनी मोदींची भेट घेतली होती. तत्पूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमवेत शिवसेना सहभागी झाल्याने सरकारचा चांगलाच तिळपापड झाला होता. त्या पाश्र्वभूमीवर मोदींनी, तुम्ही (शिवसेना) नोटाबंदीला विरोध करून चांगल्या कामास विरोध करत असल्याचे अप्रत्यक्षपणे शिवसेनेच्या खासदारांना सुचविले होते.

‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांनी काळ्या पैशांविरुद्धच्या लढाईला पाठिंबा दिला असता. मैं जब उनको उपर मिलूँगा तो वे मुझपर बहोत खूश होंगे.. मैं तो उनको जवाब दे सकूँगा, लेकिन आप उनको क्या जवाब दोगे?’ असा भावनिक सवालही केल्याचे माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते. जरी माध्यमांवर शिवसेना भडकली असली तरीही मोदींनी तसे विधान केल्याची प्रांजळ कबुली दिली आहे. मात्र माध्यमांनी रंगविलेले चित्र आणि मोदींच्या म्हणण्यामागचा संदर्भ व पाश्र्वभूमी वेगळी असल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे.

अडसूळ यांच्या मते, मोदी पुढीलप्रमाणे बोलले : ‘आप को कैसे छोडम् सकते हैं हम, आप क्या जवाब देंगे मुझे मालूम नहीं, लेकिम मैं जब उपर जाऊंगा तो बालासाहब को क्या जवाब दूँगा..’

विशेष म्हणजे, मोदींच्या वक्तव्याची चर्चा इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून चालू झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचा आदर केल्याबद्दल मोदींचे मंगळवारी आभारही मानले होते. अर्थात त्याच वेळी जनतेला त्रास झाला नसता तर बाळासाहेबांना अधिक आनंद झाला असता, असा टोमणा मारण्यासही ते विसरले नव्हते. पण दुसऱ्या दिवशी शिवसेनेने आक्रमक पवित्रा धारण केल्याचे दिसले.

मोदींना शिवसेनाप्रमुखांबद्दल नितांत आदर आहे. त्याच आदरयुक्त भावनेतून मोदी बोलले. मात्र त्याचा जाणीवपूर्वक विपर्यास केला गेला. असा बुद्धिभेद करणारे शिवसेना व भाजप युतीचे विरोधक आहेत.  संजय राऊत, राज्यसभेतील गटनेते

जिल्हा बँकांना २१ हजार कोटींचा निधी देण्याचा केंद्राने घेतलेला निर्णय निव्वळ आणि निव्वळ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठपुराव्याचा विजय आहे. तरीसुद्धा उलटसुलट वक्तव्ये छापण्याचा माध्यमांचा उद्देश समजत नाही. ममता बॅनर्जी यांच्याशी काही देणेघेणे नाही.  आनंदराव अडसूळ, लोकसभेतील गटनेते