दीप्तिमान तिवारी, एक्स्प्रेस वृत्तसेवा,

नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीच्या (एनपीआर) अर्जामध्ये नवे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत त्याला विरोधी पक्षांचे सरकार असलेल्या राज्यांनी केंद्रीय गृह सचिव ए.के. भल्ला आणि रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाच्या (आरजीआय) अधिकाऱ्यांसमवेत शुक्रवारी झालेल्या बैठकीच्या वेळी हरकत घेतली आहे.

या अर्जामध्ये व्यक्तीच्या पालकांची जन्मतारीख आणि जन्मठिकाण यांची माहिती मागितली असून त्या विशिष्ट प्रश्नाबाबत (प्रश्न क्रमांक १३-२) राज्यांनी स्पष्टीकरण मागितले आहे, असे सूत्रांनी सांगितले. पालकांची जन्मतारीख आणि जन्मठिकाण याबाबतची माहिती मागणे अव्यवहार्य आहे. कारण या देशातील काही लोकांना स्वत:ची जन्मतारीखही माहिती नाही, असे राजस्थानचे मुख्य सचिव डी. बी. गुप्ता यांनी बैठकीनंतर सांगितले.

हा प्रश्न यापूर्वीही विचारण्यात आला होता आणि तो ऐच्छिक आहे, असे आरजीआयने म्हटले आहे. गृहमंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव आणि जनगणना अधिकारी यांची बैठक बोलाविली होती त्यामध्ये आरजीआय अधिकाऱ्यांनी माहिती दिली. पश्चिम बंगाल आणि केरळने एनपीआर प्रक्रियेत सहकार्य न करण्याचे जाहीर केल्याने ही राज्ये बैठकीपासून दूर राहिली होती.