पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर चीनसोबत उद्भवलेल्या तणावासंबंधी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे गुरुवारी राज्यसभेत निवेदन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मंत्र्यांच्या निवेदनानंतर विरोधी पक्षनेते बोलतील आणि आवश्यकता भासल्यास, तसेच सभापतींनी परवानगी दिल्यास राजनाथ सिंह स्पष्टीकरण देतील, असेही सूत्रांनी सांगितले.

राज्यसभेतील पक्षनेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सिंह यांच्यासोबत संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी आणि सभागृहाचे नेते थावरचंद गहलोत हे या बैठकीला हजर होते.

संरक्षणमंत्र्यांनी या मुद्दय़ावर मंगळवारी लोकसभेत निवेदन केले होते. प्रत्यक्ष ताबा रेषेवरील जैसे थे स्थिती ‘एकतर्फी’ बदलण्याचा कुठलाही प्रयत्न मुळीच स्वीकारार्ह नसून, या भागात कुठल्याही आकस्मिक परिस्थितीला तोंड देण्यास भारताची सशस्त्र दले तयार आहेत, असा स्पष्ट संदेश चीनला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते.