तपासाची प्रभू यांची गृहमंत्र्यांना विनंती

अलीकडेच रेल्वे गाडय़ा रुळांवरून घसरण्याच्या घटनांमध्ये घातपाताची शक्यता असल्याचे संकेत देतानाच, या घटनांचा राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत (एनआयए) तपास करण्यात यावा, असे पत्र रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना लिहिले आहे.

अलीकडेच झालेल्या रेल्वे अपघातांच्या मालिकेचा एनआयएमार्फत तपास करण्यात यावा, अशी मागणी करणारे पत्र प्रभू यांनी २३ जानेवारीला गृहमंत्र्यांना लिहिले असून ज्यात ‘बाहेरच्या लोकांचा गुन्हेगारी स्वरूपाचा हस्तक्षेप असण्याची शक्यता असलेल्या’ ६ घटनांचा त्यांनी उल्लेख केला आहे. आंध्र प्रदेशातील कुनेरू रेल्वे स्थानकाजवळ हिराखंड एक्स्प्रेस रुळावरून घसरणे, कोरापुट-किरांडुल विभागात या महिन्याच्या सुरुवातीला रुळावरून घसरलेल्या दोन मालगाडय़ा, घोराशहान स्थानकाजवळ ‘कुकर बॉम्ब’ सापडण्याची घटना, १ जानेवारीला कानपूरनजीक रुळांवर आढळलेले तडे आणि बरौनी-समस्तीपूर मार्गावरील एका रेल्वे पुलावर रुळांवर सोमवारी ठेवलेले अडथळे यांचा उल्लेख प्रभू यांनी या पत्रात केला आहे.

इंदूर-पाटणा एक्स्प्रेस कानपूर येथे रुळावरून घसरून झालेल्या अपघातात सुमारे दीडशे लोक ठार झाल्याचे नमूद करून रेल्वेमंत्र्यांनी म्हटले आहे की, रेल्वे गाडय़ा घसराव्यात यासाठी रेल्वे रुळांशी छेडछाड करण्याचे प्रशिक्षण देशातील काही लोकांना देण्याचा कट बिहार पोलिसांनी उघडकीस आणला असून अशा लोकांचा कानपूरनजीकच्या अपघातात सहभाग असल्याचे त्यांना आढळले आहे.

रेल्वेच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अधिक खबरदारी बाळगण्याचे निर्देश रेल्वेमंत्र्यांनी दिले असून रेल्वे स्थानकांजवळ अथवा रेल्वे मार्गावर काही असामान्य हालचाल आढळल्यास त्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन नागरिकांना केले आहे.

काही समाजकंटक यंत्रणेचा विध्वंस करण्यासाठी अमानवी कृत्ये करीत असून त्यांची कुटिल कृत्ये हाणून पाडण्यासाठी अत्यंत दक्ष राहण्याची विनंती मी सर्वाना करतो, असे ट्वीट प्रभू यांनी बुधवारी केले.