स्वाइन फ्लू देशात पसरत असून शुक्रवारी आणखी ४० जण मरण पावल्याने मृतांची संख्या ७४३ झाली आहे. एच१ एन१ या विषाणूची लागण १२ हजार लोकांना झाली आहे. ओसेल्टामिविर औषधे व निदान संचांचा साठा सरकारने मागवला आहे. आयुष मंत्रालयाने पारंपरिक औषधे पाठवली असून त्यात काही सिरपचा समावेश आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्वाइन फ्लूच्या दोन हजार लशी खरेदी केल्या असून त्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आहेत कारण त्यांना रुग्णांपासून स्वाइन फ्लू होण्याचा धोका जास्त आहे.
गुजरात, राजस्थान, दिल्ली, महाराष्ट्र व तेलंगण या राज्यात स्वाइन फ्लूचे प्रमाण वाढत असून एच१ एन१ ची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ११ हजार ९५५ झाली आहे. ८४ लाखांचे निदान संच व टॅमी फ्लू गोळ्या मागवण्यात आल्या असून ३० लाखांचे सिरप मागवले आहे. औषधांची कुठलीही कमतरता ठेवलेली नाही, असे आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशातील स्थितीचा आपण आढावा घेतला व त्या राज्याच्या विनंतीनुसार तेथे पथक पाठवण्यात आले आहे. राज्य सरकारने औषधांबाबत विशेष सूचना दिल्या आहेत. कॅबिनेट सचिव अजित सेठ यांनीही उच्चस्तरीय बैठकीत परिस्थितीचा आढावा घेतला. भारतीय वैद्यक संशोधन परिषदेस स्वाइन फ्लूचा प्रसार असलेले भाग, वयोगट व लोकांचा वर्ग याबाबत अभ्यास करण्यात सांगितले.
 दिल्लीत स्वाइन फ्लूचे १९१७ रुग्ण नोंदवले गेले आहेत.