हॉकिंग यांच्या तोंडी वेदांची भलामण घालण्याचा प्रयत्न

आइनस्टाइनच्या सापेक्षतावादाच्या ‘इ इज इक्वल टू एमसी स्क्वेअर’ या सिद्धान्तापेक्षाही खूप प्रगत सिद्धान्त वेदांमध्ये मांडण्यात आलेला आहे, असे विश्वरचनाशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी म्हटले होते, असा दावा विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री हर्षवर्धन यांनी केला आहे. १०५ व्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात त्यांनी या माहितीचा नेमका स्रोत काय आहे हे मात्र सांगितले नाही.

हर्षवर्धन म्हणाले, की  हॉकिंग यांच्यासारखा  प्रसिद्ध वैज्ञानिक गमावला आहे. वेदांमध्ये आइनस्टाइनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धान्तापेक्षा जास्त प्रगत व सरस सिद्धान्त मांडण्यात आला आहे असे हॉकिंग यांनी म्हटले होते.  वार्ताहरांनी त्यांना हा दावा तुम्ही कशाच्या आधारे करता, माहितीचा स्रोत काय असे विचारले असता त्यांनी काही सांगण्यास टाळाटाळ केली. स्रोत तुम्हीच शोधा. मी  अधिकृतपणे बोललो आहे. वेदांमध्ये आइनस्टाइनच्या सापेक्षतेपेक्षा चांगला सिद्धान्त होता. आता हे मी कसे सांगितले हे तुम्हीच शोधून काढा.  गुगल सर्चवर हॉकिंग व वेद असा सर्च दिला तर त्यात अनेक लिंक येतात.  डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू सर्ववेद डॉट ओआरजी हे संकेतस्थळ आहे, त्यात हा दावा करण्यात आला आहे. पण ते संकेतस्थळ इन्स्टिटय़ूट ऑफ सायंटिफिक रीसर्च इन वेदाज या संस्थेचे आहे. आय सव्‍‌र्ह या संस्थेला विज्ञान व औद्योगिक संशोधन या संस्थेने मान्यता दिलेली आहे. आइनस्टाइनचा सापेक्षतावादाचा सिद्धान्त हा आधुनिक भौतिकशास्त्रातील मोठी कामगिरी होती.