तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. एमआयएमचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लिम बहुल मतदारसंघात प्रचार करु नये यासाठी त्यांना २५ लाख रुपयांची ऑफर दिली होती, हा आरोप काँग्रेसने फेटाळला आहे. ओवेसींच्या आरोपात कसलाही दम नसल्याची पुष्टीही काँग्रेसने जोडली आहे.

काँग्रेसचे नेते महेश्वर रेड्डी म्हणाले की, ओवेसींच्या आरोपात कसलाच दम नाही. जी व्यक्ती हजारो-कोट्यवधींची मालक आहे, त्यांना २५ लाख रुपयांची कोण ऑफर देईल, असा उलट सवाल त्यांनी केला. ओवेसींनी केलेल्या आरोपांची चौकशी व्हावी. चौकशीत दोषी आढळलेल्यांनी राजकारण सोडावे, असे आव्हानही त्यांनी दिले. तेलंगणातील ११९ जागांसाठी ७ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.

ओवेसी यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप करत त्यांच्या नेत्यांना पैशाची घमेंड असल्याची टीका केली होती. पैशाच्या जोरावर आमचा आवाज दाबला जाईल, असे काँग्रेसला वाटत असेल. पण ते चुकीचा विचार करत आहेत. गरीब आणि आश्रय नसलेल्या लोकांसाठी आवाज उठवण्यासाठीच मी ओळखला जातो. निर्मल परिसरात प्रचाराला मी जाऊ नये म्हणून दबाव निर्माण केला जात आहे. काँग्रेस अल्पसंख्यकांबाबत काय विचार करते हे यावरुन दिसते असेही ते म्हणाले.

निर्मल विधानसभा मतदारसंघात एमआयएमने उमेदवार दिलेला नाही. या मतदारसंघात एमआयएमने तेलंगण राष्ट्र समितीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. या उमेदवाराच्या समर्थनार्थ ओवेसी यांनी सोमवारी सभा घेतली. ‘मी या मतदारसंघात सभा घेऊ नये यासाठी काँग्रेसने मला २५ लाख रुपयांची ऑफर दिली होती. माझ्याकडे याचा पुरावा म्हणून फोन रेकॉर्डिंगही उपलब्ध आहे’, असा दावा त्यांनी केला होता. काँग्रेसच्या या कृत्यावर तुम्ही काय म्हणाल. मला कोणीही खरेदी करु शकत नाही. काँग्रेस दुसऱ्या पक्षात फोडाफोडीचा प्रयत्न करत आहे. अशा पक्षाकडून तुम्हीकडून काय अपेक्षा ठेवणार, असा सवाल त्यांनी विचारला होता.