आयपीएल गैरव्यवहारातील आरोपी ललित मोदी यांच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस का बजावायची, याची कारणे स्पष्ट करण्याची सूचना इंटरपोलने सक्तवसुली संचालनालयाला केली आहे. ललित मोदी यांच्याविरोधात भारतातील न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने इंटरपोलकडे त्यांच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावण्याची मागणी केली होती.
गेल्या महिन्यात २० तारखेला इंटरपोलने सक्तवसुली संचालनालयाकडे पत्रव्यवहार करून रेड कॉर्नर नोटीस का बजावण्यात यावी, याची कारणे विचारली आहेत. ललित मोदी यांच्याविरोधात कोणते पुरावे उपलब्ध आहेत, या गुन्ह्यातील अन्य आरोपी कोण आहेत, त्याचबरोबर या गुन्ह्याचा तपास करण्यास इतका विलंब का लागला, याचा खुलासा करावा, असेही इंटरपोल सचिवालयाने म्हटले आहे.
दरम्यान, लंडनमध्ये ललित मोदींचे कायदेशीर सल्लागार म्हणून काम पाहणाऱया लिंडबोर्ग कंपनीने इंटरपोल सचिवालयाशी संपर्क साधला असून, ललित मोदींची बाजू ऐकल्याशिवाय एकतर्फी कोणतीही कारवाई करू नये, असे म्हटले आहे. त्यावर ललित मोदी यांना बाजू मांडण्यासाठी संधी दिली जाईल, असे इंटरपोल सचिवालयाकडून त्यांना सांगण्यात आले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 7, 2015 12:35 pm