News Flash

देशातील चालकरहित पहिल्या मेट्रोला मोदींनी दाखवला हिरवा झेंडा

एकाच कार्डवरुन कोणत्याही सार्वजनिक वाहनातून प्रवास करण्याची सुविधाही सुरु

नवी दिल्ली : देशातील पहिली चालकविरहित मेट्रो ट्रेन दिल्लीत सुरु झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याला हिरवा झेंडा दाखवला.

राजधानी दिल्लीत देशातील पहिली पूर्णपणे स्वयंचलित चालकविरहित मेट्रो ट्रेन सोमवारपासून सुरु झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा कंदील दाखवला. दिल्ली मेट्रोच्या मॅजन्टा लाईनवर ही मेट्रो धावणार आहे. यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देखील उपस्थित होते.

या प्रकल्पाबाबत बोलताना मोदी म्हणाले, “माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात देशातील पहिला मेट्रो रेल्वे प्रकल्प दिल्लीत उभारण्यात आला. सन २०१४ मध्ये देशातील केवळ ५ शहरांमध्ये मेट्रो रेल्वे धावत होती. आज १८ शहरांमध्ये मेट्रो रेल्वे धावत आहेत. सन २०२५ पर्यंत देशातील २५ शहरांमध्ये आम्ही मेट्रो प्रकल्प वाढवणार आहोत.”

देशात सन २०१४ मध्ये केवळ २४८ किमी इतक्या अंतरावर मेट्रो लाईन सुरु होत्या. आज तीनपट जास्त म्हणजेच ७०० किमी अंतरावर मेट्रो धावत आहेत. सन २०२५ पर्यंत आम्ही त्या १७०० किमी पर्यंत नेण्याचा प्रयत्न करत आहोत, असंही मोदी यावेळी म्हणाले. मेट्रोचा विस्तार करताना ‘मेक इन इंडिया’ मोहिम महत्वाची भूमिका बजावत असून यामुळे प्रकल्पांचा खर्च कमी झाला असून परकिय चलनाचीही बचत झाली आहे. तसेच देशातील नागरिकांना अधिक रोजगारही उपलब्ध झाल्याचेही मोदींनी यावेळी सांगितले.

दरम्यान, पंतप्रधानांच्या हस्ते कॉमन मोबिलिटी कार्डचेही उद्घाटन करण्यात आले. देशाच्या आधुनिकीकरणासाठी हे महत्वाचे पाऊल असून तुम्ही कोणत्याही सार्वजनिक वाहनातून प्रवास करा, यासाठी हे एकच कार्ड तुम्हाला उपयोगी पडेल, असं मोदी यावेळी म्हणाले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांचे आधुनिक मेट्रो सेवा उपलब्ध झाल्याबद्दल अभिनंदन केले. तसेच दिल्ली मेट्रोचा समावेश आता जगातील काही निवडक शहरांमध्ये झाल्याचे सांगताना दिल्लीत वेगानं विकास होत असल्याचंही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2020 2:54 pm

Web Title: the countrys first driverless metro launched in delhi the prime minister showed the green signal aau 85
Next Stories
1 न्यायालयात हजर राहणे टाळण्यासाठी भाजपा आमदाराने बनवला खोटा करोना अहवाल आणि नंतर..
2 मालकाची विकृती, कॉम्प्रेसरने मजुराच्या गुदद्वारात भरली हवा
3 पोस्टाच्या तिकिटावर चक्क छोटा राजनचा फोटो; टपाल विभागाचा अनागोंदी कारभार
Just Now!
X