करोनाची दुसरी लाट ओसरत असतांना देशात ‘डेल्टा प्लस’ या करोनाच्या नवीन प्रकारामुळे चिंतेचे वातावरण आहे. ‘डेल्टा प्लस’ मुळे देशात करोनाच्या तिसऱ्या लाटेशी शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर ‘डेल्टा प्लस’मुळे मध्य प्रदेशात पहिला मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.

उज्जैन येथील महिलेच्या करोनामुळे मृत्यूनंतर त्यांचे नमुने घेतले होते. नमुने जीनोम सिक्वेंसिंगसाठी दिल्लीला पाठविण्यात आले होते. दरम्यान त्यांच्या रीपोर्टमध्ये डेल्टा प्लस हा नवीन प्रकार आढळला आहे. मध्य प्रदेशात आतापर्यंत डेल्टा प्लसची एकूण दोन प्रकरणे नोंदली गेली आहेत. यातील तीन प्रकरणे भोपाळची असून दोन प्रकरणे उज्जैनमधील आहेत. यातील चार जण बरे झाले आहेत, पण एकाचा मृत्यू झाला आहे.

उज्जैनचे नोडल अधिकारी डॉ. रौनक यांनी इंडिया टूडेला याबाबत माहिती दिली, ते म्हणाले, “डेल्टा प्लस व्हेरियंटची बाधा झाल्याने एका २३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. महिलेच्या पतीलाही करोनाची लागण झाली होती. पतीने करोना लशीचे दोन्ही डोस घेतले होते. तो विषाणूतून बरा झाला आहे. मात्र, महिलेने लशीचा एकही डोस घेतला नव्हता.”

डेल्टा प्लस व्हायरसमुळे देशात करोनाची तिसरी लाट येणार?

देशात करोनाची तिसरी लाट येणार असल्याने चिंता व्यक्त होत असताना डेल्टा प्लसच्या विषाणूंनी यामध्ये भर टाकली आहे. दरम्यान देशातील काही तज्ज्ञ डॉक्टर तसंच जनुकीय क्रमनिर्धारकांनी (जिनोम सीक्वेन्सर) हे नवे विषाणू या संक्रमण वाढीस कारणीभूत ठरत नसल्याचं म्हटलं आहे. इन्सिट्यूट ऑफ जिनोमिक्स अॅण्ड इंटरग्रेटिव्ह बायालॉजीचे संचालक डॉक्टर अनुराग अग्रवाल यांनी करोनाच्या दुसऱ्या लाटेत सुरक्षेचे नियम कमी केले जाऊ नयेत अशी सूचना यावेळी केली आहे.

‘डेल्टा प्लस’चे देशात ४० रुग्ण

“सध्याच्या घडीला डेल्टा प्लसचा करोनाच्या तिसऱ्या लाटेशी संबंध असल्याचे कोणतेही पुरावे हाती नाहीत,” अशी माहिती डॉक्टर अग्रवाल यांनी एनडीटीव्हीशी बोलताना दिली आहे. “माझ्या संस्थेने जून महिन्यात महाराष्ट्रातील एकूण ३५०० नमुने गोळा केले. यामध्ये एप्रिल आणि मे महिन्यातील नमुन्यांचाही समावेश होता. डेल्टा प्लसचे विषाणू असल्याचं यामध्ये निष्पन्न होत असून पण याचं प्रमाण एक टक्क्यांपेक्षा कमी असेल,” असं त्यांनी सांगितलं आहे.