लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतरही काँग्रेसचे नेते राहुल गांधींना विरोधीपक्ष म्हणून आपल्या भुमिकेचे गांभीर्य कळालेले दिसत नाही. कारण, त्यांनी याबाबत केलेल्या एका विधानामुळे सोशल मीडियावर लोकांनी त्यांना विविध प्रतिक्रिया देत ट्रोल केले आहे.


लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी बुधवारी आपला जुना मतदारसंघ अमेठीला भेट दिली. याठिकाणी त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांबरोबर नागरिकांशीही चर्चा केली. दरम्यान, येथे कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, ‘नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत, योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत तसेच अमेठीच्या खासदार स्मृती इराणी आहेत, हे तिघेही भाजपाचे नेते आहेत. त्यामुळे आपल्याला आता विरोधीपक्षाचे काम करावे लागत आहे. हे खूपच आनंददायी आणि सोपे काम आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी विरोधीपक्ष म्हणून आपले काम करायला हवे.’ राहुल गांधींच्या या विधानाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. मात्र, यावरुन आता त्यांना ट्रोल केले जात आहे.

यापूर्वीही राहुल गांधींच्या एका विधानावर अशाच प्रकारे लोकांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी मुंबईतील कोर्टात एका प्रकरणावरील सुनावणीसाठी हजेरी लावली त्यावेळी त्यांनी म्हटले होते की, ‘माझ्यावर आक्रमण होत असून मला मजा येत आहे.’

दरम्यान, राहुल गांधी यांनी अमेठीच्या दौऱ्यादरम्यान आपल्या पराभवाला पक्षाच्या स्थानिक नेत्यांना जबाबदार धरले. त्याचबरोबर त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले की, आपण सध्या वायनाड येथून भलेही खासदार असू मात्र, अमेठी आपले घर असून हारल्यानंतरही आपण हे घर सोडणार नाही.