संपूर्ण जगाचे लक्ष्य लागून राहिलेल्या ‘चांद्रयान-२’चे भारताने यशस्वी प्रक्षेपण केले. सोमवारी दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी श्रीहरीकोटा येथील तळावरुन चांद्रयान-२ अवकाशात झेपावले. जीएसएलव्हीएमके३-एम१ प्रक्षेपकाने चांद्रयान-२ ला पृथ्वीच्या कक्षेत सोडले. पुढील ४८ दिवस भारतीय अवकाश संशोधन संस्थेमधील म्हणजेच इस्रोमधील वैज्ञानिक चांद्रयान-२ यशस्वीपणे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्याकडे लक्ष ठेऊन असतील. ७ सप्टेंबर रोजी पहाटे २ वाजून ५८ मिनिटांनी चांद्रयान-२ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. मात्र जगभरात सध्या चांद्रयान-२ मोहिमेची चर्चा असली तरी इस्रोमध्ये भारताच्या आखणीन एक मोठ्या मोहिमेचे काम सुरु आहे. ही मोहिम आहे सूर्याचा अभ्यास करण्यासाठी यान पाठवण्याची.

‘चांद्रयान-२’च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर बोलताना इस्रोचे अध्यक्ष के. सिवान यांनी इस्रोच्या भविष्यातील मोहिमांसंदर्भात काम सुरु करणार असल्याची माहिती दिली. ‘आम्ही आजच (सोमवारी) पुढील ‘कार्टोसॅट-३’ या मोहिमेबद्दल चर्चा करण्यासंदर्भातील माहिती घेतली आहे. या वर्षी आम्ही कार्टोसॅटच्या अनेक मोहिमा राबवणार आहोत,’ असं सिवान यांनी सांगितलं. वेगवेगळ्या कारणांसाठी अंतराळातून पृथ्वीचे निरिक्षण करण्यासाठी कार्टोसॅट अवकाशात सोडण्यात येतात.

२०२० च्या पुर्वाधामध्ये इस्रो सूर्याचा अभ्यास करण्यासाठी सौरयान पाठवण्याचा प्रयत्न करणार आहे. इस्रोने याबद्दल आधीच घोषणा केली आहे. सूर्याच्या अभ्यासासाठी आखण्यात आलेल्या स्वारीकरिता पाठवण्यात येणाऱ्या या सौरयान मोहिमेला ‘आदित्य एल वन’ असे नाव देण्यात आले आहे. पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर अंतरावर इस्रो हे सौरयान पाठवणार आहे. हे यान अवकाशातील एल वन या अंतरापर्यंत पाठवण्यात येणार आहे. एल वन म्हणजेच लॅग्रॅगियल पॉइट हा पृथ्वी आणि सूर्यामधील असा बिंदू आहे जिथे दोघांचाही उपग्रहावर असणारे अभिकेंद्री बल (centripetal force) समान असते. यामुळेच या बिंदूजवळ असणारा उपग्रह कक्षेत ठेऊन त्यावर नियंत्रण ठेवणे शक्य होते.

‘आदित्य एल वन’ सौरयानाच्या माध्यमातून सूर्याच्या पृष्ठभागावरुन निघाणाऱ्या रेडिएशचा अभ्यास केला जाणार आहे. याशिवाय २०२० च्या शेवटापर्यंत भारत लो अर्थ ऑरबीट उपग्रहाचे प्रक्षेपण करण्याच्या तयारीत आहे. भारताच्या गगनयान या महत्वाकांशी मोहिमेचा हा एक भाग असणार आहे. इस्रो गगनयान ही मानवरहित मोहिम २०२१ साली डिसेंबर महिन्यात राबवण्याच्या तयारीत आहे.