चेन स्नॅचिंग किंवा बॅग हिसकावण्याचे प्रकार अनेकदा रस्त्यांवर घडतात. यामागे एक चोर नसतो तर टोळीही असते. अशाच एका टोळीने व्यापाऱ्याची बॅग हिसकावून मिळतील पैसे वाटून घ्यायचे असे ठरवले होते. त्याप्रमाणे या टोळीने व्यापाऱ्याची बॅग हिसकावलीही. बॅग उघडून पाहिली तेव्हा हाती आले ते फक्त ५ रूपये. एवढेच नाही तर या सगळ्यांना पोलिसांनी अटकही केली आहे. दिल्लीतील व्यापाऱ्याच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे.

काही आठवड्यांपूर्वी या व्यापाऱ्याला चोरट्यांनी लुटले. शाहदारा परिसरात ही घटना घडली होती. याच परिसरात हा ४३ वर्षीय व्यापाऱ्याचे घर आहे. या व्यापाऱ्याचे जॅकेटसाठीचे फोम आणि मटेरिअल बनवण्याचा कारखाना आहे. या व्यापाऱ्याला लुटण्याचा कट त्याच्या कारखान्या शेजारी काम करणाऱ्या खलिद नावाच्या माणसाने आखला होता अशीही माहिती समोर आली आहे. खलिद हा या कटाचा मास्टरमाईंड होता. खलिद हा जॅकेट तयार करण्याचे युनिट चालवत असे. तसेच ज्या व्यापाऱ्याला त्याने लुटले तो खलिदकडे कायम येत आहे.

खलिदला हे ठाऊक होते की त्या व्यापाऱ्याजवळ लाखो रूपये असतात. दररोज जेव्हा तो घरी परततो तेव्हा त्याच्या बॅगेत लाखो रूपये असत. खलिदने या व्यापाऱ्याजवळचे पैसे पाहिले होते. तसेच चेक, पैसे भरल्याच्या पावत्याही पाहिल्या होत्या. त्यानंतर खलिदने या व्यापाऱ्याला लुटण्याचा कट आखला अशी माहिती शाहदारा पोलीस ठाण्याच्या पोलीस उपायुक्त मेघना यादव यांनी दिली. हिंदुस्थान टाइम्सने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

खलिदने त्यानंतर त्याच्या चार मित्रांसोबत या व्यापाऱ्याला लुटण्याचा कट आखला. ठरल्याप्रमाणे २६ मे रोजी हा व्यापारी आपल्या घरी लाखो रूपये घेऊन चालला आहे असे खलिदला वाटले. त्याच्या मित्रांना त्याने तशी कल्पना दिली आणि आपल्याला आजच त्या व्यापाऱ्याला लुटायचे आहे असेही सांगितले. यामधल्या दोघांनी मिरची पूड टाकून त्या व्यापाऱ्याला लुटले. त्यांच्या हाती बॅग तर आली पण बॅगेत पाच रूपयांशिवाय काहीही नव्हते. त्यानंतर या व्यापाऱ्याने यासंदर्भात पोलिसात तक्रार केली. ज्यानंतर या सगळ्यांना अटक करण्यात आले. या सगळ्यांची रवानगी आता तुरुंगात करण्यात आली आहे.