निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही दोषींची फाशी दिल्ली न्यायालयाने कायम ठेवण्याचा निकाल आज दिला. २२ जानेवारी रोजी, सकाळी सात वाजता या चारही आरोपींनी फाशी देण्यात येईल असं न्यायालयाने म्हटलं आहे. तसेच, या चारही आरोपींना अन्य पर्यायांचा विचार करायचा असल्यास १४ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. या चारही आरोपींविरोधात न्यायालयाने ‘डेथ वॉरंट’ सुनावलं केलं आहे.

मात्र, न्यायालयाने एखाद्या आरोपीस डेथ वॉरंट सुनावल्यापासून ते त्याला फासावर लटकवले जाईपर्यंतीची संपूर्ण प्रक्रिया नेमकी कशी असते, याबाबत अनेकांना माहिती नसते.

एखाद्या आरोपीस न्यायालयाकडून डेथ वॉरंट सुनावण्यात आल्यानंतर त्याच्या फाशीची तारीख आणि वेळ निश्चित केल्या जाते. जेव्हा फाशीची शिक्षा झालेल्या आरोपीचं अपील कुठेही प्रलंबित नसेल व मर्जी पिटिशन देखील पेडिंग नसेल तेव्हा याबाबत कनिष्ठ न्यायालयास कळवले जाते. यानंतर कनिष्ठ न्यायालयाकडून डेथ वॉरंट सुनावलं  जातं. साधारणपणे ज्या कनिष्ठ न्यायालयाने पहिल्यांदात फाशीची शिक्षा सुनावलेली असते, त्याच न्यायालयासमोर जेल प्रशासन रिपोर्ट सादर करते, आरोपीची याचिका कोणत्याही न्यायालयाकडे किंवा राष्ट्रपतीकडे प्रलंबित नाही. यानंतर न्यायालय डेथ वॉरंट सुनावत आरोपीस फासावर चढवण्याची तारीख व वेळ निश्चित करते.

डेथ वॉरंट सुनावण्यात आल्यानंतर –
डेथ वॉरंट सुनावण्यात आल्यानंतर त्या आरोपीस इतर कैद्यांपासून वेगळे ठेवले जाते. त्याच्या सेलमध्ये कोणत्याही प्रकारचे सामान नसते, जेणेकरून आरोपीने एखाद्या भांड्याचा वापर करून स्वतःला जखमी करून घेऊ नये. याशिवाय त्याच्यावर चोवीसतास लक्ष दिले जाते. त्याच्या नातलगांना त्याला फाशी होण्याच्या २४ तास अगोदरपर्यंतच भेटू शकतात. शिवाय, तुरूंग प्रशासनाच्या नियामवलीला अनुसरूनच ही भेट होत असते.

फासावर जाण्याअगोदर अंतिम इच्छा –
आरोपील फासावर लटकवले जाण्याअगोदर त्याला दंडाधिकारी भेटतात व त्याची काही अंतिम इच्छा आहे का? याबाबत विचारणा करतात. अशावेळी जर त्याला आपल्या नावावरील संपत्ती कोणाच्या नावे करायची असेल, तर त्याच्या इच्छेनुसार दंडाधिकारी संपत्तीचा कायदेशीर अधिकार हस्तांतरित करण्याचे आदेश देतात.

फाशी पहाटेच का? –
साधारणपणे कोणत्याही कैद्यास पहाटे फाशी दिली जाते. या मागे कारण असे सांगण्यता आले आहे की, अन्य कैद्यी जागे होण्या अगोदर कारवाई व्हावी, जेणेकरून तुरुंगातील वातावरण ठीक राहील. तसेच, आरोपीस जास्त विचार करण्यास वेळ देखील मिळणार नाही की, त्याला फासावर लटकवले जाणार आहे.

फाशी देतानाची प्रक्रिया –
आरोपीस तुरूंगात असलेल्या त्या ठिकाणी नेल्या जाते ज्या ठिकाणी फाशीचा दोर लटकवण्यात आलेला आहे. यावेळी फाशी देणाऱ्या जल्लादासह पोलीस अधीक्षक, डॉक्टर व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थिती असते. फाशी देताना आरोपीचा चेहरा काळ्या कपड्याने झाकला जातो व त्यानंतर त्याला तो फासावर लटकणार आहे, त्या जागेवर नेले जाते. या ठिकाणी जल्लाद त्याच्या गळ्यात फाशीचा दोर अडकवतो व खटका ओढला जातो. आरोपी फासावर लटकल्यानंतर दोन तासांनी डॉक्टर त्याची तपासणी करून, त्याला मृत घोषित करतात. यानंतर त्याचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या हवाले केला जातो.