करोनाशी लढताना ज्या डॉक्टरांचा मृत्यू झाला त्यांना सशस्त्र दलातील शहिदांचा दर्जा द्यावा, त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार सरकारी नोकऱ्या द्याव्यात, अशी मागणी करणारे पत्र भारतीय वैद्यकीय संघटनेने (आयएमए) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे.

सरकारी आकडेवारीचा संदर्भ देऊन आयएमएने म्हटले आहे की, आरोग्यक्षेत्रातील ८७ हजार कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली असून त्यापैकी ५७३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तथापि, केंद्र सरकारने अधिकृतपणे ही आकडेवारी जाहीर केलेली नाही.

करोनाशी लढताना ज्या डॉक्टरांचा मृत्यू झाला त्यांना शहिदांचा दर्जा देऊन त्यांच्या कुटुंबीयातील व्यक्तीला अथवा मृत्यू झालेल्या डॉक्टरच्या पत्नीला त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार सरकारी नोकरी द्यावी, असे आयएमएने म्हटले आहे.