राजधानी दिल्लीत उपासमारीमुळे तीन चिमुरड्या मुलींचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मंगळवारी सकाळी जेव्हा महिला आपल्या तीन मुलींना रुग्णालयात घेऊन आली तेव्हा डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. पोलिसांनी जेव्हा मुलींच्या आईला मृत्यू कसा झाला विचारलं तेव्हा त्यांनी ‘मला अन्न द्या’ इतकंच म्हणाल्या आणि खाली कोसळल्या. मृत पावलेल्या मुली दोन, चार आणि आठ वर्षाच्या होत्या.

डॉक्टरांनी तिन्ही बहिणींचा उपासमारीमुळे मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे. गेल्या आठ दिवसांपासून त्यांनी काहीच खाल्लं नव्हतं. सोमवारी रात्री त्याची प्रकृती प्रचंड खालावली होती. ‘जेव्हा त्यांना आणण्यात आलं, तेव्हा जे काही समोर आलं ते पाहून मला प्रचंड धक्का बसला. सरकारी रुग्णालयातील माझ्या १५ वर्षाच्या करिअरमध्ये मी असं काहीच पाहिलं नव्हतं’, असं रुग्णालयातील डॉक्टरने सांगितलं आहे.

शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच जणांचं हे कुटुंब मूळचं बंगलाचं आहे. मुलींच्या वडिलांच्या मित्रासोबत ते दिल्लीला आले होते. मुलींचा मृत्यू झाल्यापासून वडिल बेपत्ता आहेत. रिक्षा चोरीला गेल्यापासून तो कामाच्या शोधात होता. काम शोधण्यासाठी घऱाबाहेर पडलेला तो अद्याप परतलाच नाही असं शेजाऱ्यांनी सांगितलं आहे. दरम्यान मुलींच्या आईची मानसिक स्थिती योग्य नसल्याचं दिसत आहे असं पोलिसांनी सांगितलं आहे.

दोन बहिणी गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. त्यांनी उलट्यांचाही त्रास होत होता. मात्र सर्वात मोठ्या मुलीला शाळेत मध्यान्ह भोजन मिळत असतानाही आजारी कशी पडली असा प्रश्न निर्माण होत आहे. कुटुंब राहत असलेल्या ठिकाणी फॉरेन्सिक टीमला काही औषधं सापडली असून, ती तपासली जात आहेत.