चीन बंदुकीची ताकत दाखवतो तर, तिबेटी जनतेकडे सत्याची शक्ती आहे असे तिबेटी धर्मगुरु दलाई लामा बुधवारी म्हणाले. “चीनमध्ये आज बौद्धांची सर्वाधिक लोकसंख्या आहे. चीनला त्यांचा धर्म सर्वात जास्त वैज्ञानिक वाटतो. पण आमच्याकडे सत्याची शक्ती आहे. चीनच्या कम्युनिस्टांकडे बंदुकीची ताकत आहे. भविष्याचा विचार केल्यास बंदुकीपेक्षा सत्याची ताकत जास्त प्रभावी ठरेल” असे दलाई लामा यांनी ख्रिसमसच्या निमित्ताने चीन सरकारला दिलेल्या संदेशात म्हटले आहे.

“प्रत्येकाने आनंदी, समाधानी राहून शांततामय मार्गाने आयुष्य जगण्याचा संकल्प केला पाहिजे. जन्मत: माणसामध्ये दयेची भावना असते. प्रेम, दया, स्नेह यामध्ये मनाची शांतता दडली आहे” असे दलाई लामा म्हणाले. “लोकांनी त्यांच्या आसपास ज्या भौतिक गोष्टी आहेत, त्या कितपत महत्वाच्या आहेत, याचा विचार केला पाहिजे. भौतिक सुख हे तात्पुरते असते” यासाठी त्यांनी एक उदहारण दिले.

“एखादा माणूस अब्जोपती असतो, पण तो मनाने आनंदी नसतो, त्यामुळे मनाच्या शांततेमध्ये आनंद दडला आहे. आपण कुठल्याही धर्माला मानत असलो तरी, मनात स्नेहभावना ठेऊ शकतो असे दलाई लामा म्हणाले. “आज धर्माच्या नावाखाली एक माणूस दुसऱ्या माणसाची हत्या करतोय. पण त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी, सर्व धर्म प्रेमाचा संदेश देतात. आपण सर्वांनी धार्मिक सलोखा वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे” असा संदेश दलाई लामा यांनी दिला.