शॉर्ट व्हिडिओ मेकिंग प्लॅटफॉर्म ‘टिकटॉक’ आता लवकरच हाँगकाँगच्या मार्केटमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. कंपनीच्या प्रवक्त्यांनी सोमवारी उशीरा याबाबत संकेत दिले आहेत.

येत्या काही दिवसांमध्ये टिकटॉक हॉंगकाँगच्या मार्केटमधून बाहेर पडेल, असे टिकटॉकच्या प्रवक्त्याने वृत्तसंस्था reuters सोबत बोलताना सांगितलं. फेसबुकसह अन्य टेक्नॉलॉजी कंपन्याही त्यांचं काम बंद करत आहेत, अशीही माहिती यावेळी प्रवक्त्याने दिली. नुकत्याच घडलेल्या काही घडामोडींमुळे आम्ही हाँगकाँगमधूल टिकटॉक अॅपचं काम थांबवण्याचा निर्णय घेतला आहे, असं या प्रवक्त्याने सांगितलं.

आणखी वाचा- भारतानंतर अमेरिकाही टिकटॉकसह चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याच्या तयारीत

चिनी संसदेमध्ये खास हाँगकाँगसाठी बनवण्यात आलेला राष्ट्रीय सुरक्षा कायदा मंजूर झाल्यानंतर चीनच्या बाइट डान्स कंपनीची मालकी असलेल्या टिकटॉकने हाँगकाँगमधून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारकडून देण्यात आलेल्या निर्देशांनंतर टिकटॉकने हा निर्णय घेतला. चिनी संसदेमध्ये गेल्या आठवड्यात खास हाँगकाँगसाठी बनवण्यात आलेला राष्ट्रीय सुरक्षा कायदा मंजूर झाला. त्यामुळे संपूर्ण हाँगकाँगवर कब्जा करण्याचा चीनचा मार्ग मोकळा झाला आहे.