News Flash

धर्मापासून दहशतवाद वेगळा काढण्याची गरज- मोदी

युवकांचे मूलतत्त्ववादीकरण थांबवण्यासाठी मार्ग शोधले पाहिजेत, असे मोदी म्हणाले.

जॉर्डनचे राजे अब्दुल्ला यांच्याशी चर्चा

धर्मापासून दहशतवाद वेगळा काढला पाहिजे. इस्लामिक स्टेट म्हणजे इसिससारख्या संघटनांनी पसरवलेल्या आंतरराष्ट्रीय दहशतवादाला खंबीरपणे तोंड देण्याची गरज आहे असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या वेळी शुक्रवारी ते जॉर्डनचे राजे अब्दुल्ला यांच्याशी चर्चा करीत होते त्यावेळी त्यांनी इसिसच्या धोक्याचा मुद्दा उपस्थित केला. युवकांचे मूलतत्त्ववादीकरण थांबवण्यासाठी मार्ग शोधले पाहिजेत, असे मोदी म्हणाले.
दोन्ही नेत्यांनी इसिस हा आंतरराष्ट्रीय समुदायाला मोठा धोका असल्याचे मान्य केले, मोदी यांनी सांगितले की, धर्माचा दहशतवादाशी संबंध जोडता कामा नये. इसिसच्या धोक्याला तोंड देण्यासाठी आंतरराष्ट्रीय दहशतवादाविरोधात जाहीरनामा तयार करावा लागेल. आंतरराष्ट्रीय समुदायाने यावर आता एकमुखाने बोलण्याची व जागतिक कृती करण्याची वेळ आली आहे, असे मोदी यांनी सांगितले.
जॉर्डनने आंतरराष्ट्रीय दहशतवादाविरोधात जो खंबीरपणा दाखवला त्याबाबत मोदी यांनी राजे अब्दुल्ला यांची प्रशंसा केली. इराक व सीरियात अडकून पडलेल्या भारतीयांना सोडवण्यात केलेल्या मदतीबद्दल त्यांनी अब्दुल्ला यांचे आभार मानले.
आमचा देश जगातील एकषष्ठांश लोकसंख्येचे नेतृत्व करतो तरीही सुरक्षा मंडळात प्रतिनिधित्व दिले जात नाही, असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी सांगितले की, गेली अनेक वर्षे आम्ही संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात स्थान मिळवण्यासाठी लढा देत आहोत, संयुक्त राष्ट्रांमध्ये सुधारणा करण्याची मागणी करीत आहोत. जॉर्डनच्या राजांनी भारताला सुरक्षा मंडळाचे स्थायी सदस्यत्व देण्याच्या मागणीला पाठिंबा दिला. भारत हा महत्त्वाचा भागीदार असून आर्थिक व सुरक्षा क्षेत्रात सहकार्याला वाव आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2015 2:33 am

Web Title: time to delink terror from religion need global response against is says narendra modi
Next Stories
1 सुरक्षा परिषदेच्या विस्तारावर मोदी ठाम
2 अमेरिकेत शीख आणि पटेल समाजाकडून मोदींचा निषेध
3 धर्माला दहशतवादापासून दूर ठेवले पाहिजे- मोदी
Just Now!
X