जम्मू काश्मीरमध्ये जैश ए मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांचा भारतीय सैन्यदलाने खात्मा केला आहे. यामधला एकजण जैश ए मोहम्मदचा टॉप कमांडर होता. मुन्ना लाहोरी असं या दहशतवाद्याचं नाव असून तो संघटनेतला बॉम्ब एक्सपर्ट म्हणून ओळखला जात होता. याच मुन्ना लाहोरीचा भारतीय सैन्य दलाने खात्मा केला. १७ जूनला मुन्ना लाहोरीने IED ब्लास्ट घडवला होता. त्याच्या याच कृत्याचा सूड भारतीय सुरक्षा दलाने घेतला आहे. मुन्ना लाहोरी IED स्फोटके बनवण्यात तज्ज्ञ होता.

 

मार्च महिन्यात सुरक्षा दलांवर झालेल्या बॉम्ब हल्ल्यातही मुन्ना लाहोरीचा हात होता. मुन्ना लाहोरी १९ वर्षांचा होता, तो आपल्याप्रमाणेच जम्मूतल्या इतर तरुणांनाही दहशतवादाकडे वळवत होता. शुक्रवारी रात्रीपासूनच सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु होती. या चकमकीत दोन दहशतावद्यांचा खात्मा करण्यात आला. ज्यापैकी एक दहशतवादी मुन्ना लाहोरी आहे. सुरक्षा दलांनी या दोघांकडे असलेली स्फोटके आणि हत्यारेही जप्त केली आहेत.

१७ जून रोजी पुलवामा या ठिकाणी राष्ट्रीय रायफल्सच्या पथकावर जो हल्ला करण्यात आला तो आईईडी स्फोट होता. या स्फोटात वापरण्यात आलेले IED मुन्ना लाहोरीने तयार केलेलं होतं. या स्फोटानंतर मुन्नाला अटक करण्यासाठी मोहीम राबवण्यात आली होती. मात्र तो हाती लागला नव्हता आता सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत मुन्नाचा खात्मा करण्यात आला आहे.