News Flash

‘पेगॅसस’ प्रकरणावरून राज्यसभेत गदारोळ

तृणमूल काँग्रेसच्या खासदाराने कागदांची फाडाफाडी केल्यामुळे विरोधकांप्रमाणे भाजपचे सदस्यही आक्रमक झाले.

केंद्रीय मंत्र्यांचे निवेदनपत्र फाडल्याने विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये बाचाबाची
नवी दिल्ली : ‘पेगॅसस’ गुप्तहेर तंत्रज्ञानाच्या कथित हेरगिरी प्रकरणावरून राज्यसभेत गुरुवारी अभूतपूर्व गोंधळ झाला. केंद्रीय माहिती व तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या निवेदनाचे कागद हिसकावून घेऊन ते उपसभापतींच्या आसनाकडे भिरकावण्यात आले. विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सभापतींच्या समोरील हौदात येऊन घोषणाबाजी केली. भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांमध्ये बाचाबाची झाल्यामुळे सुरक्षारक्षकांना मध्यस्थी करावी लागली. अशा प्रचंड गदारोळात मंत्र्यांचे निवेदन पूर्ण न होताच वरिष्ठ सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाले.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव हे ‘पेगॅसस’ प्रकरणावर मंगळवारी राज्यसभेत स्पष्टीकरण देणार होते, पण करोनावरील चर्चेमुळे ते गुरुवारी दोन वाजता केंद्र सरकारची भूमिका मांडणार असल्याची माहिती सभागृहाला देण्यात आली होती. सभागृहाचे कामकाज सुरू होताच ‘पेगॅसस’ आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधकांनी घोषणाबाजी केल्याने सभापती व्यंकय्या नायडू यांनी सभागृह लगेचच तहकूब केले, त्यानंतर ते १२ वाजता दुसऱ्यांदा तहकूब झाले. दुपारच्या सत्रात सभागृह सुरू झाल्यानंतर वैष्णव यांनी लेखी निवेदनातील मजकूर वाचताच तृणमूल काँग्रेसचे खासदार शांतनू सेन यांनी वैष्णव यांच्या हातातील कागद हिसकावून घेतले आणि उपसभापती हरिवंश यांच्या दिशेने भिरकावले. गोंधळ वाढत गेल्याने वैष्णव यांनी निवेदन वाचन न करता ते सभागृहाच्या पटलावर मांडले.

तृणमूल काँग्रेसच्या खासदाराने कागदांची फाडाफाडी केल्यामुळे विरोधकांप्रमाणे भाजपचे सदस्यही आक्रमक झाले. तृणमूलचे सदस्य आणि केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांच्यामध्ये बाचाबाची सुरू झाली. अखेर त्यांची भांडणे सोडवण्यासाठी सभागृहातील मार्शलना मध्यस्थी करावी लागली. पुरी यांनी मला धमकी दिली, त्यांनी मला शारीरिक मारहाण करण्याचाही प्रयत्न केला. माझ्या सहकाऱ्यांनी मला वाचवले, असा दावा सेन यांनी संसद भवनाबाहेर केला. ‘पेगॅसस’ प्रकरणावर वैष्णव यांनी लोकसभेत निवेदन दिले असून तेच राज्यसभेतही वाचून दाखवत आहे. दोन्ही सभागृहांमध्ये निवेदन देऊन केंद्र सरकार पळ काढत आहे. केंद्र सरकारने या विषयावर निवेदन देण्यापेक्षा सविस्तर चर्चा करावी अशी मागणी तृणमूल काँग्रेसने केली. उपसभापती हरिवंश यांनी, संसदीय परंपरा मोडणारे कृत्य न करता केंद्रीय मंत्र्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे अशी विनंती विरोधी पक्षांच्या सदस्यांना केली, मात्र गदारोळ सुरू राहिल्याने सभागृह दिवसभरासाठी तहकूब केले गेले.

लोकसभाही तहकूब

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी लोकसभेतही विरोधकांनी कामकाज होऊ दिले नाही. विरोधक प्रामुख्याने शेती कायदे आणि पेगॅसस या दोन मुद्द्यांवरून आक्रमक झाले होते. प्रश्नोत्तराचा तास दहा मिनिटांतच गुंडाळण्यात आला व सभागृह तहकूब करण्यात आले. सभागृहाचे कामकाज सुरू होताच काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, अकाली दल या पक्षांच्या सदस्यांनी घोषणाबाजी केली. या गोंधळामुळे लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तरासाठी सदस्यांची घेतलेली नावेही ऐकू येत नव्हती. प्रश्नोत्तराच्या तासाला प्रश्न विचारण्याचा प्रत्येक सदस्याचा अधिकार असून तो विनासायास सुरू राहावा. विरोधकांच्या सर्व मुद्द्यांवर केंद्र सरकार चर्चा करण्यास तयार असल्याचे संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले, मात्र विरोधकांची घोषणाबाजी कायम राहिली. त्यानंतरही सभागृह कामकाज दोनदा तहकूब होऊन अखेर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.

निलंबनाची कारवाई?

खासदार शांतनू सेन यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे. सभागृहातील गैरवर्तनाबद्दल सेन यांना निलंबित करण्याची विनंतीही भाजपकडून राज्यसभेच्या सभापतींना केली जाणार आहे. या प्रकरणाचे संसदेबाहेर पडसाद उमटले असून भाजपच्या खासदार व परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी पक्षाच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस व तृणमूल काँग्रेस यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला. या दोन्ही पक्षांच्या सदस्यांची वर्तवणूक लाजिरवाणी असून त्यांनी देशाची प्रतिष्ठा धुळीला मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. ‘पेगॅसस’ हा बनावट बातमीचा प्रकार असून त्यामुळे देशाची प्रतिमा मलीन झाली आहे. केंद्रीय मंत्री भाषण देत असताना त्यांच्या हातातील कागद फाडून टाकणे ही विरोधी सदस्यांची कृती अत्यंत निकृष्टच होती, अशी टीका लेखी यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2021 12:03 am

Web Title: trinamool congress mp from pegasus alleged espionage case akp 94
Next Stories
1 देशात उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत वाढ
2 पोलिसांच्या ‘देखरेखी’खाली २०० शेतकऱ्यांचे आंदोलन
3 दैनिक भास्कर, भारत समाचार यांच्या कार्यालयांवर प्राप्तिकर खात्याचे छापे
Just Now!
X