जोधपूर : जोधपूर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्था म्हणजे आयआयटीत २५ विद्यार्थ्यांसह २९ जणांना करोनाचा संसर्ग झाला असून एकूण रुग्णसंख्या आता २२५ झाली आहे.  सोमवारी संस्थेत आणखी २९ रुग्ण सापडले असून त्यांच्या परिसरातच चाचण्या करण्यात आल्या, असे संस्थेचे उपकुलसचिव अमरदीप शर्मा यांनी सांगितले.

एकूण २९ विद्यार्थी व कर्मचारी यांना करोना संसर्ग झाल्याचे ७ मे रोजी आढळून आले होते. शेवटच्या सत्राच्या परीक्षा ७ मे रोजी संपल्या होत्या. आता ऑनलाइन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. अनेक विद्यार्थी एप्रिलमध्ये संस्थेच्या परिसरात आले होते, तेव्हाच संसर्ग पसरण्यास सुरुवात झाली असे शर्मा यांनी म्हटले आहे. प्रात्यक्षिक वर्ग सुरू होते त्यामुळे विद्यार्थ्यांना बोलावण्यात आले होते, त्यात मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात आले होते. ज्यांना संसर्ग झाला आहे त्यापैकी कुणाचीही प्रकृती चिंताजनक नसून त्यांच्या चाचण्या सकारात्मक आल्या आहेत.  आयआयटी प्रशासनाने म्हटले आहे, की रुग्णांची संख्या वाढल्याने काळजी घेण्यात आली असून विलगीकरण केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.

विद्यार्थ्यांचे नमुने घेण्यात आले असून परिसरात येणाऱ्या सर्वांचीच तपासणी होत आहे. ज्यांच्या चाचण्या सकारात्मक येतील, त्यांना विलगीकरणात ठेवण्यात येत आहे.