अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-चीन सीमावादात मध्यस्थीची तयारी दाखवल्यानंतर आता यावर संयुक्त राष्ट्राने प्रतिक्रिया दिली आहे. कोणी मध्यस्थी करावी, हे संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस सांगू शकत नाहीत, पण यामध्ये सहभागी असलेल्या सर्वांनी तणाव वाढेल अशी कुठलीही कृती टाळावी असे संयुक्त राष्ट्राच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

सध्या सर्वच आघाडयांवर चीन विरोध करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल आश्चर्यकारकरित्या लडाखमध्ये सुरु असलेल्या भारत-चीन सीमावादात मध्यस्थीची तयारी दाखवली. “दोन्ही देशांमध्ये समेट घडवण्याची अमेरिकेची इच्छा असून आम्ही त्यासाठी तयार आहोत. दोन्ही देशांना याबद्दल कळवले आहे” असे टि्वट ट्रम्प यांनी केले होते.

“कोणी मध्यस्थी करावी, हे ते दोन देशच ठरवू शकतात. ते आम्ही सांगू शकत नाही. या परिस्थितीवर आमचे लक्ष आहे. यामध्ये सहभागी असलेल्या सर्वांनाच आमची आणखी तणाव निर्माण होईल अशी कृती करु नये अशी विनंती आहे” असे संयुक्त राष्ट्राच्या सरचिटणीसांचे प्रवक्ते स्टीफेन दुजारिक यांनी सांगितले.

सीमेवरील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे चीनचे स्पष्टीकरण
भारतालगत सीमेवर परिस्थिती स्थिर व नियंत्रणात असून दोन्ही देशात संवाद व सल्लामसलतीच्या मार्गाने प्रश्न सोडवण्यासाठी यंत्रणा कार्यरत आहेत, असे चीनने बुधवारी म्हटले आहे. भारत व चीन यांच्यात सीमेवर तणावाची स्थिती असल्याच्या पार्श्वभूमीवर चीनने हे स्पष्टीकरण केले आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी सांगितले की, दोन्ही देशातील सीमा प्रश्नाशी निगडित चीनची भूमिका सातत्यपूर्ण व स्पष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यात दोनदा अनौपचारिक चर्चा झाल्या होत्या त्यावेळी सीमेवर शांतता निर्माण करण्यासाठी विश्वासवर्धक उपायांवर भर देण्यात आला होता. तेव्हा दोन्ही नेत्यात जे मतैक्य झाले त्या दिशेनेच आमची वाटचाल सुरू आहे.