News Flash

समजून घ्या : कोठे आणि कसं पाहणार चंद्रग्रहण, ग्रहणासंबंधित संपूर्ण माहिती

वर्षाचे पहिले चंद्रग्रहण आज (बुधवार) २६ मे रोजी होणार आहे

वर्षाचे पहिले चंद्रग्रहण आज (बुधवार) २६ मे रोजी होणार आहे. पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहणाची घटना घडते. ग्रहण हे केवळ वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच महत्त्वाचे नसते तर त्याला धार्मिक महत्त्व देखील आहे. विज्ञानाच्या मते, ग्रहण एक खगोलीय घटना आहे, जी विशेष परिस्थितीत उद्भवते. धार्मिक मान्यतेनुसार, चंद्रग्रहण अशुभ मानले जाते. म्हणूनच, या काळात बरीच कामे करण्यास मनाई आहे. चंद्र ग्रहण केव्हा, कोठे, कोणत्या वेळी आणि कसे दिसेल हे समजून घेऊया…

चंद्रग्रहणाचा दिवस आणि वेळ

या वर्षातील पहिले खग्रास चंद्रग्रहण आज बुधवार, वैशाख पौर्णिमेच्या दिवशी दुपारी ३-१५ ते सायं. ६-२३ या वेळेत होणार असून ते आपल्याला दिसणार नाही. मात्र या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ  येणार असल्याने सुपरमूनचे दर्शन संपूर्ण भारतातून होणार असल्याचे खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

नासाच्या म्हणण्यानुसार, २६ मे म्हणजे आज लोकांना आकाशात एक भिन्न दृश्य पहायला मिळेल. यात वर्षातील पहिले  चंद्रग्रहण, सुपरमून आणि तिसरे ब्लड मून असेल.

कुठे पाहता येईल चंद्रग्रहण

चंद्रग्रहण अतिपूर्व ईशान्य भारतातून ओरिसातील पुरी, भुवनेश्वार, कटक, कोलकत्ता, आसाम, मिझोराम, मेघालय, नागालँड, अरुणाचल, मणिपूर आणि अंदमान निकोबार बेटे येथून दिसणार आहे. आपल्या इथे त्यावेळी चंद्र दृश्य आकाशात नसल्याने आपल्या इथून हे चंद्रग्रहण दिसणार नाही. तसेच हे चंद्रग्रहण चीन, जपान, कोरिया, थायलंड, सिंगापूर, इंडोनेशिया, अमेरिकेतील काही भाग येथून दिसणार आहे. आज बुधवारी या वर्षातील अखेरच्या सुपरमूनचे दर्शन मात्र आपणा सर्वांस साध्या डोळ्यांनी घेता येणार आहे. चंद्र हा पृथ्वीपासून सरासरी ३ लक्ष ८४ हजार कि. मीटर अंतरावर आहे. पौर्णिमेच्या दिवशी जर चंद्र पृथ्वीच्या जवळ आला तर चंद्रबिंब १४ टक्के मोठे व ३० टक्के जास्त तेजस्वी दिसते. यावेळी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ ३ लक्ष ५७ हजार ३१० कि.मीटर अंतरावर येणार आहे. त्यामुळे तो मोठा व जास्त तेजस्वी दिसणार आहे. बुधवारी, वैशाख पौर्णिमेच्या दिवशी सायं. ७ वाजून १४ मिनिटांनी सुपरमून पूर्वेला उगवेल. रात्रभर आकाशात सुंदर, मनोहारी दर्शन देऊन उत्तररात्री ६ वाजून ३६ मिनिटांनी मावळेल.

सुपरमून म्हणजे काय?

पृथ्वीभोवती फिरता फिरता जेव्हा चंद्र पृ्थ्वीच्या जवळात जवळ बिंदूवर येतो, तेव्हा पौर्णिमेचा चंद्र नेहमीपेक्षा मोठा दिसतो. यालाच सुपरमून म्हणतात. चंद्राची पृथ्वीभोवती फिण्याची कक्षा लम्बवर्तुळाकार आहे. जेव्हा त्याचे पृथ्वीपासून जास्तीत जास्त अंतर ४,०६,६९२ किलोमीटर असते, त्यावेळी तो अपोजी बिंदूवर असतो. तर कमीतकमी अंतर ३,५६,५०० किलोमीटर असताना तो पेरिजी बिंदूवर असतो. या बिंदूजवळ पौर्णिमेच्या दिवशी चंद्र आल्यास त्याचा आकार नेहमीपेक्षा १४ टक्क्यांनी मोठा आणि ३० टक्क्यांनी जास्त प्रकाशित दिसतो या खगोलीय घटनेला ‘सुपरमून’ म्हणतात. जेव्हाजेव्हा चंद्र पृथ्वीपासून ३,६१,८८५ किलोमीटर किंवा त्याहून कमी अंतरावर असतो, तेव्हाच्या पौर्णिमेला सुपरमून दिसतो.

सुतक लागेल का?

या ग्रहणाचा सूतक कालावधी वैध ठरणार नाही. हे उपछाया चंद्रग्रहण आहे. जे उघड्या डोळ्यांनी पाहिले जाऊ शकत नाही. ज्योतिषानुसार, त्याच ग्रहणाचा सूतक कालावधी वैध आहे. जे उघड्या डोळ्यांनी स्पष्टपणे दिसू शकते. चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्र सामान्य पौर्णिमेच्या चंद्रासारखा दिसतो. म्हणजेच पौर्णिमा चंद्र आणि उपछाया चंद्रग्रहणात काही फरक नाही. हे ग्रहण पाहण्यासाठी, विशेष उपकरणे आवश्यक आहेत.

उपछाया ग्रहण म्हणजे काय?

चंद्र पृथ्वीच्या वास्तविक सावलीत न येता. तिच्या उपछायेतून बाहेर निघतो. तेव्हा उपछाया ग्रहण लागते. उपछाया ग्रहण प्रत्यक्ष चंद्रग्रहण मानले जात नाही. या ग्रहणकाळात चंद्राच्या रंग आणि आकारात कोणताही फरक नाही. चंद्रावर फक्त एक पुसट छाया दिसते. खगोलशास्त्रीय शास्त्रानुसार, चंद्र आणि सूर्यामध्ये पृथ्वी येते आणि सूर्यप्रकाशाच्या चंद्रावर पडत नाही तेव्हा प्रत्यक्ष ग्रहण येते. या घटनेस चंद्रग्रहण म्हणतात.

चंद्रग्रहण कसे पाहावे?

उघड्या डोळ्यांनी चंद्रग्रहण पाहणे पूर्णपणे सुरक्षित आहे. जर तुम्हाला त्याची सुंदर दृश्ये जवळून बघायची असतील तर आपण दुर्बिणीची मदत घेऊ शकता. हे उपछाया चंद्रग्रहण आहे, म्हणून ते पाहण्यासाठी, विशेष सौर फिल्टर चष्मा वापराता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 26, 2021 9:59 am

Web Title: understand where and how to see lunar eclipses complete information about eclipses srk 94
टॅग : Lunar Eclipse
Next Stories
1 Explained: करोनाला रोखण्यासाठी ‘ट्रिपल’ लॉकडाउन; म्हणजे नेमकं काय?
2 Explained: भारतात २६ मे नंतर फेसबुक, ट्विटर बंद होणार?; जाणून घ्या नेमकी स्थिती
3 गोष्ट मुंबईची: …जेव्हा मुंबई बेटाचं वार्षिक भाडं होतं फक्त ७५ पौंड
Just Now!
X