स्वातंत्र्यदिनी अर्थात १५ ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेशातील एक किंवा दोन नाही तब्बल ८ हजार मदरशांमध्ये देशभक्तीची चाचणी होणार आहे. एवढंच नाही तर राष्ट्रध्वज फडकवणं आणि राष्ट्रगीत म्हणणं हेदेखील अनिवार्य करण्यात आलं आहे. या सगळ्या कार्यक्रमाचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचीही सक्ती करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातल्या मदरसा परिषदेनं या संदर्भातलं एक पत्रकच लागू केलं आहे.

उत्तर प्रदेशात स्वातंत्र्यदिनी मदरशांना असे आदेश पहिल्यांदाच देण्यात आले आहेत. योगी सरकारच्या मदरसा परिषदेनं दिलेल्या या आदेशामुळे नवा वाद ओढवण्याची शक्यता आहे कारण अशाप्रकारचे आदेश लागू करणं म्हणजे आमच्या देशभक्तीवर संशय व्यक्त करण्याचा प्रकार आहे अशी प्रतिक्रिया मदरसा संचालकांनी दिली आहे. उत्तर प्रदेशातल्या मदरसा परिषदेनं हे आदेश ३ ऑगस्ट रोजीच लागू केले आहेत. या कार्यक्रमाचं व्हिडिओ चित्रण आणि फोटो काढणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

भविष्यात राष्ट्रीय कार्यक्रमांना प्रोत्साहन मिळावं म्हणून हे फोटो आणि व्हिडिओ कामी येतील असंही पत्रात म्हटलं आहे. नेमकं काय करायचं कार्यक्रम कसा साजरा करायचा याचा कार्यक्रमच मदरसा परिषदेनं आखून दिला आहे.

मदरशांमध्ये असा साजरा करायचा आहे स्वातंत्र्य दिन

१) ध्वजारोहण आणि राष्ट्रगीत

२) शहिदांना श्रद्धांजली

३) स्वातंत्र्य दिनाचं महत्त्व काय ते सांगणं

४) मदरशांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून देशभक्तीपर गीतं सादर करणं

५) स्वातंत्र्य संग्रामात बलिदान देणाऱ्या देशभक्तांची माहिती देणं

६) राष्ट्रीय एकता हा उद्देश समोर ठेवून सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धांचं आयोजन

७) मिठाई वाटप

मदरसा परिषदेनं हा सातकलमी कार्यक्रमच आखून दिला आहे. योगी आदित्यनाथ सरकारतर्फे आखून देण्यात आलेल्या कार्यक्रमावरून आता वाद सुरू झाला आहे. मदरशांना अशा प्रकारचे आदेश देणं यामागे राजकीय हेतू आहे, आमच्या देशभक्तीवर संशय घेण्याचा प्रकार आहे असं मदरसा संचालकांनी म्हटलं आहे.

आम्हाला आमची देशभक्ती सिद्ध करण्यासाठी कोणत्याही प्रमाणपत्राची गरज नाहीये. स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्याचा उद्देश एकात्मता असू शकतो, पण या कार्यक्रमाचं व्हिडिओ चित्रीकरण का करायचं आहे? या आदेशाला काय अर्थ आहे? हा आमच्यावर घेतलेला संशयच नाही का? असे प्रश्न मदरसा संचालकांनी उपस्थित केले आहेत. आता योगी सरकारच्या या निर्णयामुळे उत्तर प्रदेशात स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर वाद पेटणार हे निश्चित आहे.