उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी एनकाउंटरचे फरमान जारी करत गुन्हेगारांवर वचक बसवण्यास सुरुवात केली आहे. मात्र दुसरीकडे राज्यातील पोलीस खाते त्यांच्या वागण्यामुळे अनेकदा या मोहिमेतील हवाच काढून टाकताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या अशाच एका प्रकारे सध्या उत्तर प्रदेश पोलीस खाते सोशल मिडियावर मस्करीचा विषय झाले आहे. असमोली पोलिस स्थानकाच्या हद्दीमध्ये २५ हजार इमान असणाऱ्या एका गुंडाच्या एनकाउंटरचा हा व्हिडीओ एएनआय वृत्तसंस्थेने ट्विट केला आहे. गुंडावर गोळीबार करताना एका पोलील अधिकाऱ्याची रिव्हॉल्वर खराब झाल्याने त्यामधून गोळ्या निघत नाहीत. त्यावेळी त्याच्याबरोबरच सहकारी तोंडाने ‘ठाय… ठाय…’ असे गोळ्यांचे आवाज काढताना दिसत आहे.

असमोली पोलिस स्थानकाच्या हद्दीमध्ये शुक्रवारी रात्रीच्या सुमारास पोलीस आणि गुंडामध्ये चकमक झाली. या चकमकीमध्ये वरिष्ठ पोलीस अधिक्षक पंकज पांड्ये आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी सुदेश कुमार घटनास्थळी पोहचले. दोन्हीकडून गोळीबार करण्यात आला. या चकमकीची माहिती मिळताच जवळच्या पोलीस स्थानकांमधून अतिरिक्त कूमक मागवण्यात आली. सर्व पोलीस पाठलाग करत असल्याने गुंडांने मुबारकपूर येथील जंगलाच्या दिशेने पळ काढला. जंगलाजवळच्या ऊसाच्या एका शेतामध्ये गुंडानी आसरा घेतला. त्यावेळी पोलिसांनी त्यांना सर्व बाजूने घेरले. गुंडावर गोळीबार सुरु असताना अचानक एका पोलीस अधिकाऱ्याचे रिव्हॉल्वर खराब झाले. हे पाहताच सोबत असलेल्या दुसरा पोलीस अधिकारी तोंडातून ‘ठाय… ठाय…’ असा आवाज काढू लागला. हा आवाज काढून गुंडाना घाबरवण्याचा पोलिसांचा हेतू होता असे पोलिसांचे म्हणणे असले तरी यामुळे उत्तर प्रदेश पोलीस खाते मस्करीचा विषय ठरले आहे.

या संदर्भात स्पष्टीकरण देताना संबळ जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधिक्षक पंकज पांड्ये यांनी पोलिसांची बाजू मांडली. रिव्हॉल्वरमधून गोळ्या चालवताना अनेकदा एकामगोमाग एक गोळ्या चावल्यावर ते अडकते. अशावेळी ते खाली करुन पुन्हा गोळीबार केला जातो. शुक्रवारी रात्री असमोली स्थानक पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडलेल्या चकमकीमध्येही असेच झाल्याचे पांड्ये यांनी सांगितले. या व्हिडीओचा थोडासाच तुकडा व्हायरल करण्यात येत आहे. संपूर्ण व्हिडीओ पाहिल्यावर त्यावेळेच्या परिस्थितीचा अंदाज बांधता येईल असे सांगतानाच पांड्येंनी तोंडाने आवाज का काढण्यात आला याचेही उत्तर दिले. गुन्हेगारांवर दबाव आणण्यासाठी अशापद्धतीने तोंडाने आवाज काढले जातात असेही पांड्ये यावेळी म्हणाले.

मात्र पोलिसांचे हे स्पष्टीकरण नेटकऱ्यांना पटले नसून त्यांनी या आगळ्यावेगळ्या चकमकीवरून पोलिसांना लक्ष्य केले आहे.

बंदूक असो नसो आम्ही लढणार

दिवाळी पण अशीच साजरी करणार

या चकमकीमधील हा प्रकार व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेश पोलीस दलातील अनेकांनी अधिकाऱ्यांनी अंधाराचा फायदा घेत स्वत:च्या सुरक्षेसाठी तोंडाने आवाज काढून गुंडाना घाबरवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगत त्यांच्या बचाव केला आहे.