बजरंग दलाचे कार्यकर्ते व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या आणि अश्लिल चाळे करणाऱ्या प्रेमी युगुलांचे व्हिडियो शूटींग करणार आहे. व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी सेलिब्रेशनच्या नावाखाली कोणतीही अनैतिक घटना घडू नये यासाठी हे नियोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच यावेळी युगुलांना त्रास देणाऱ्यांचेही शूटींग केले जाणार असून ते पोलिसांना दिले जाणार आहे. आमच्या कार्यकर्त्यांकडून प्रेमी युगुलांना त्रास दिला जातो असे आरोप अनेकदा होतात. मात्र तसे होणार नाही याची काळजीही यानिमित्ताने घेण्यात येणार आहे.

बजरंग दलाच्या देहरादून विभागाचे समन्वयक विकास वर्मा याबाबत म्हणाले, या कामासाठी शहरात २५० कार्यकर्त्यांची टीम तैनात करण्यात येणार आहे. या टीम महिला महाविद्यालये, मॉल्स, बगिचे यांच्याबाहेर नेमण्यात येणार आहेत. जी युगुले अश्लिल चाळे करत असतील त्यांच्यावर या मार्गाने लक्ष ठेवण्यात येणार आहे. हे व्हिडियो पोलिसांना देण्यात येणार असून पोलिसांना या सर्व गोष्टींवर योग्य ती कारवाई करण्यासाठी त्याचा निश्चितच फायदा होईल असे सांगण्यात आले आहे. आम्ही सगळ्याच युगुलांना त्रास देणार नाही, तर जे अश्लिल चाळे करत असतील त्यांच्यावर वचक आणण्यासाठी हे करत असल्याचे वर्मा यांनी स्पष्ट केले. या व्हिडियोमध्ये चेहरे ब्लर कऱण्यात येणार असून त्याचा कोणत्याही पद्धतीने गैरवापर होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे.