उत्तर प्रदेशचा गढ ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी लोकसभा निवडणूक विजयाची गुरुकिल्ली असल्याचे गृहीत धरून पुढील निवडणुकीत भारतीय जनता पक्ष उत्तर प्रदेशमध्ये निश्चितच चांगली कामगिरी करेल, असे वक्तव्य पक्षाचे नेते अमित शहा यांनी केले. शहा यांनी बुधवारी उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना शहा यांनी उत्तर प्रदेशमधील पक्षाची कामगिरी सुधारण्यावर भर देणार असल्याचे स्पष्ट केले.
उत्तर प्रदेशची कामगिरी पहिल्यांदाच माझ्याकडे सोपविण्यात आलीये. तरीही मी खात्रीपूर्वक सांगू शकतो की पुढील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विजयाचा पाया हा उत्तर प्रदेशमधूनच रोवला जाईल, असे शहा यांनी सांगितले. प्रभारीपद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच शहा यांचे उत्तर प्रदेशात आगमन झाले. उत्तर प्रदेशमधील भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे विमानतळावर जोरदार स्वागत केले.
उत्तर प्रदेशमध्ये गेल्यावर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला ४७ जागा मिळाल्या होत्या. त्याचबरोबर २००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील ८० पैकी अवघ्या १० जागांवर पक्षाचे उमेदवार विजयी झाले होते. त्या पार्श्वभूमीवर पुढील रणनीती आखण्यासाठी शहा उत्तर प्रदेशातील पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत. यामध्ये लालजी टंडन, कलराज मिश्र, ओमप्रकाश सिंग यांचा समावेश आहे.